शिस्तप्रिय एसटी प्रवासी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:35 IST2021-03-15T04:35:12+5:302021-03-15T04:35:12+5:30
सातारा-बामणोली एसटीने शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांसह अनेक प्रवासी एसटीने प्रवास करतात. या मार्गावर खासगी वाहतूक होत नाही. त्यामुळे एसटीला ...

शिस्तप्रिय एसटी प्रवासी
सातारा-बामणोली एसटीने शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांसह अनेक प्रवासी एसटीने प्रवास करतात. या मार्गावर खासगी वाहतूक होत नाही. त्यामुळे एसटीला सतत गर्दी असते. सध्या कोरोना वाढत असल्याने प्रवास करणारे सर्व प्रवासी तोंडाला मास्क लावूनच प्रवास करत आहेत. शहरांतून विनामास्क फिरणाऱ्यांनी या ग्रामीण प्रवाशांकडून बोध घेण्याची खरी गरज आहे. (छाया : लक्ष्मण गोरे)
१२बामणोलीएसटी
०००००००००
किराणा दुकानांत गर्दी
सातारा : कोरोनाचा शिरकाव वाढल्यानंतर संसर्ग कमी व्हावा, यासाठी प्रशासनातर्फे गर्दी न करण्याबाबत वारंवार आवाहन केले जात आहे. तरीही साताऱ्यातील अनेक किराणा दुकानात सातत्याने गर्दी होत आहे. त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
०००००००
कठडे ढासळले
सातारा : पाटण तालुक्यातील अनेक भागात डोंगररांगा पसरलेल्या आहेत. मात्र अनेक ठिकाणचे संरक्षक कठडे ढासळलेले आहेत. त्यामुळे अपघातांचा धोका निर्माण होत असतो. रात्री दुचाकीस्वारांना गैरसोयीचा सामना करावा लागतो. तीव्र उतारावर समोरुन वाहनांना रस्ता देण्याच्या नादात दुचाकी घाटातून खाली जाण्याचा धोका असतो.
००००००
मास्कला मागणी
सातारा : कोरोनाबाधित रुग्ण संस्था असल्याने नागरिकांमध्ये धाकधुकीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे मास्क खरेदी करणे क्रमप्राप्त झाले आहे. आठवडा बाजार तसेच चौकाचौकात मास्क विक्रीसाठी आले आहेत. ते खरेदीसाठी नागरिकांमधून गर्दी होत आहे. त्यातून धुऊन वापरता येणारे मास्क सर्वाधिक वापरले जातात.
००००००
जनावरांची वाहतूक
सातारा : मालवाहू गाड्यांमधून जनावरांची विनापरवाना वाहतूक करण्याचे प्रमाण वाढले आहे. लहान टेम्पोमध्ये प्रमाणापेक्षा अधिक जनावरे कोंबल्याने त्यांचे हाल होत आहेत. अशा वाहनांवर पोलिसांकडून कारवाई होण्याचे प्रमाणही मोठ्या प्रमाणावर वाढले आहे.
००००००००००
कार्यालयांत नियमभंग
सातारा : शाळा-महाविद्यालयात शिक्षकांच्या पन्नास टक्के उपस्थितीबाबत सूचना केल्या आहेत. मात्र अनेक शासकीय कार्यालयांमध्ये नागरिकांची गर्दी होत आहे. ही परिस्थिती अशीच राहिली तर कोरोनाचा संसर्ग आणखी वाढल्याशिवाय राहणार नाही.
००००००
कर्जाचे आमिष दाखविणाऱ्या संदेशचे पेव
सातारा : कोरोनामुळे गेल्या वर्षी लाॅकडाऊन जाहीर झाला. तेव्हा असंख्य तरुणांचे रोजगार गेले. उद्योग बंद झाले. मात्र अशा तरुणांच्या असाह्यतेचा गैरफायदा घेण्याचे प्रमाण वाढले आहे. कर्ज देण्याबाबत आमिष दाखविणारे संदेश मोबाइलवर येत आहेत. अशा संदेशपासून सावध होण्याची गरज निर्माण झाली आहे.
९०००००००००
उसाला आगी
सातारा : जिल्ह्यातील अनेक ठिकाणचा ऊस अद्याप गेलेला नाही. अशा उसाच्या फडांना आगी लागण्याच्या घटनांमध्ये काही दिवसांपासून सतत वाढ होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून चिंता व्यक्त होत आहे. संबंधित नुकसानीची पाहणी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.
००००००
पेट्रोल चोरीत वाढ
सातारा : पेट्रोलच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने पार्किंगमध्ये लावलेल्या गाड्यांमधून पेट्रोल काढून घेण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे दुचाकीस्वारांतून नाराजी व्यक्त होत आहे. अनेकजण अशा चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पाळत ठेवून आहेत. संबंधितांवर कारवाईची मागणी होत आहे.
००००००
खेळण्यांची मोडतोड
सातारा : जिल्ह्यातील अनेक बागा गेल्या वर्षीपासून बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे प्रशासनाचेही बागांकडे लक्ष नाही. तसेच काही बागांमध्ये लहान मुलांची खेळणी मोठी माणसं खेळत असल्याने त्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणच्या बागांमधील खेळण्यांची मोडतोड झालेली आहे.
००००००००
माठांना मागणी
सातारा : उन्हाळा काही दिवसांवर आला असून आतापासूनच उन्हाची चटके बसायला लागली आहेत. त्यामुळे सातारकरांमधून माठांना मोठ्या प्रमाणावर मागणी येत आहे. काहीजण साताऱ्यापासून काही अंतरावर असलेल्या ग्रामीण भागातून खरेदी करत आहेत.
००००००००
पाणपोईची गरज
सातारा : उन्हाची तीव्रता वाढत असल्याने त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. राज्य परिवहन महामंडळाचे बसस्थानक तसेच सार्वजनिक ठिकाणी पाणपोईची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.
००००००
उखडलेल्या रस्त्याचे पॅचवर्क
सातारा : साताऱ्यातील मंगळवार तळे, व्यंकटपुरा पेठेतील रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. रस्ता दुरुस्तीची मागणी करण्यात येत होती. या उखडलेल्या रस्त्यावर पालिकेच्या वतीने रविवारी पॅचवर्क करण्यात आले आहेत. मात्र रस्त्याचे डांबरीकरण करावे, अशी मागणी नागरिकांमधून वारंवार केली जात आहे. तशीच डांबरीकरणाची मागणी होत आहे.
०००००००
टोप्यांना मागणी
वडूज : दुष्काळी खटाव तालुक्यात मोठ्या प्रमाणावर उन्हाच्या झळा बसत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातून दुपारी शेतात जाणे अवघड जात आहे. त्यामुळे दुचाकीस्वारांमधून टोप्या, गाॅगलला मागणी वाढत आहे. आकर्षक रंग, आकारातील टोप्या बाजारात विक्रीसाठी आल्या आहेत.
०००००००
पार्किंगची गैरसोय
सातारा : साताऱ्यातील प्रांताधिकारी, तहसील कार्यालयात विविध शासकीय कामासाठी नागरिक येत असतात. मात्र या ठिकाणी वाहने उभी करण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नाही. त्यामुळे नागरिकांना आवाराच्या बाहेर गाड्या लावाव्या लागतात. मात्र तेथून उचलून नेल्या जातात.
००००००००
सातारकरांची रेल्वे वाहतुकीकडे पाठ
सातारा : राज्याच्या विविध भागात कोरोनाबाधित रुग्ण संख्या वाढत आहे. तसेच रेल्वे एका राज्यातून दुसऱ्या राज्यात अनेक जिल्ह्यातून येत असते. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका वाढत असल्याने सातारकरांनी रेल्वेचा वापर करण्याकडे पाठ फिरवली आहे. अनेकजण पुणे, मुंबई तसेच इतर ठिकाणी जाण्यासाठी एसटीचा वापर करण्यावर भर देत आहेत. त्यामुळे एसटीच्या प्रवासी संख्येबरोबरच उत्पन्नातही वाढ होत आहे.