कामचुकारांना शिस्त लावणार; पण गोडीगुलाबीनं!
By Admin | Updated: October 6, 2015 00:22 IST2015-10-05T23:01:13+5:302015-10-06T00:22:23+5:30
त्रुटी दूर करू : नूतन जिल्हा शल्यचिकित्सक श्रीकांत भोई यांनी व्यक्त केला निर्धार

कामचुकारांना शिस्त लावणार; पण गोडीगुलाबीनं!
सातारा : ‘कामचुकारांचं आधी गोड शब्दांत समुपदेशन, मग शाब्दिक इशारा, नंतर लेखी इशारा आणि सरतेशेवटी कारवाई, अशी कार्यशैली असेल,’ असे संकेत नूतन जिल्हा शल्यचिकित्सक श्रीकांत भोई यांनी दिले आहेत. जिल्हा रुग्णालयातील त्रुटी आणि कमतरता भरून काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.जिल्हा शल्यचिकित्सकपदाची सूत्रे डॉ. भोई यांनी नुकतीच हाती घेतली आहेत. त्या निमित्ताने जिल्हा रुग्णालयातील आरोग्यसेवेची सद्य:स्थिती, कमतरता, त्रुटी, कार्यपद्धती याविषयी बोलते केले असता ते म्हणाले, ‘उपलब्ध मनुष्यबळ कमी आहे. तज्ज्ञ डॉक्टरांची मोठ्या संख्येने गरज आहे. विविध विभागांमध्ये काही कमतरता प्रथमदर्शनी दिसत आहेत. या सर्व बाबी शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी सर्वसमावेशक प्रस्ताव पाठविला जाईल. तसेच उपलब्ध मनुष्यबळाकडून कामात कुचराई होऊ नये यासाठी कर्मचाऱ्यांचे आधी गोडीगुलाबीने समुपदेशन केले जाईल. टप्प्याटप्प्याने समज देत अखेर कारवाईचा बडगा उगारला जाईल.’जिल्हा रुग्णालयाच्या प्रसूती कक्षात साठ रुग्णांची सोय आहे. परंतु सद्य:स्थितीत तेथे नव्वदपेक्षा जास्त रुग्ण आहेत. रेडिओलॉजीसह अनेक विभागांमध्ये तज्ज्ञांची कमतरता आहे. उपलब्ध यंत्रसामग्री हाताळण्यासाठी तज्ज्ञ उपलब्ध नाहीत, ही वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली असता डॉ. भोई म्हणाले, ‘सर्वच विभागांमध्ये काही ना काही कमतरता आहेत; त्रुटी आहेत.
ट्रॉमा सेन्टरची योजना केंद्र सरकारची असल्यामुळे ती टप्प्याटप्प्याने उभारण्यात येत आहेत. आतापर्यंत केवळ आठ ते नऊ ट्रॉमा सेन्टरची उभारणी पूर्ण झाली आहे. साताऱ्याचा नंबर कधी लागेल, तेव्हा लागेल; पण विभागवार अत्यावश्यक सुविधांची यादी तयार करून शासनाकडे प्रस्ताव सादर केला जाईल. जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मागणी करण्यात येईल.’
गर्भलिंगचिकित्सा रोखण्याच्या दृष्टीने ‘पीसीपीएनडीटी’ कारवाईसाठी सर्व सुविधा जिल्हा रुग्णालयाला पुरविण्यात आल्या आहेत. छुपे कॅमेरेही दिले आहेत. तरीही कारवाई होत नाही, याकडे लक्ष वेधले असता, आपल्या कारकिर्दीत अशा कारवाया होतील, याची हमी डॉ. भोई यांनी दिली. सीटी स्कॅनसारख्या सुविधांसाठी केवळ तंत्रज्ञांच्या अभावामुळे खासगी रुग्णालयात जावे लागू नये, या दृष्टीने आपण प्रयत्नशील राहू, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
मेडिकल कॉलेजबाबत माहिती घेऊ
साताऱ्यात वैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणीचा प्रस्ताव अनेक वर्षे धूळ खात पडून आहे. कधी जमिनीच्या कारणावरून तर कधी सरकारी आदेशामुळे हा प्रस्ताव मागेच पडला आहे. तो मार्गी लावण्यासाठी आपण प्रयत्न करणार का, असे विचारले असता डॉ. भोई म्हणाले, ‘याबाबत अंतिम निर्णय मंत्रालय पातळीवरच होईल. परंतु सध्याची परिस्थिती काय आहे, याची माहिती घेऊन प्रस्ताव मार्गी लावण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला जाईल.’
‘एमडी’ मिळतच नाहीत
मनुष्यबळाची कमतरता हाच रुग्णसेवा पुरविण्यातील महत्त्वाचा अडथळा असल्याचे सांगून डॉ. भोई म्हणाले, ‘एमडी मेडिसिन आणि एमडी रेडिओलॉजी या संवर्गातील उमेदवार मिळतच नाहीत, अशी स्थिती आहे. सांगलीत आम्हाला हाच अनुभव आला. जाहिराती देऊनसुद्धा ही पदे रिक्तच राहतात. यावर उपाय शोधण्याची गरज आहे.’