जिल्हा बॅँकेत जुुन्या संचालकांनी बाजूला थांबावे !
By Admin | Updated: February 7, 2015 00:16 IST2015-02-06T22:51:13+5:302015-02-07T00:16:03+5:30
उदयनराजे : प्रस्थापितांनी लोकांच्या भावनेशी खेळणे थांबवावे, अन्यथा लोकांच्या सहनशीलतेचा अतिरेक होईल

जिल्हा बॅँकेत जुुन्या संचालकांनी बाजूला थांबावे !
सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांनी जिल्हा बँकेत नव्यांना, तरुणांना संधी दिली गेली पाहिजे, याचा पुनरुच्चार केला. बँकेच्या सभासदांनीही यावेळी विद्यमान संचालकांना थांबण्यास सांगावे आणि नव्यांना संधी देण्याची विनंती करावी. मात्र, विद्यमान संचालक पुन्हा बँक निवडणुकीस उभे राहिले तर लोकांच्या हितासाठी व त्यांचा प्रतिनिधी म्हणून संचालकांवर अंकुश ठेवण्यासाठी आपणास जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी उभे राहावे लागेल. प्रस्थापितांनी लोकांच्या भावनेशी खेळणे थांबावावे, जर त्यांनी थांबवले नाही, तर लोकांचा अतिरेक होईल आणि त्यांच्या भावनांचा स्फोट होईल,’ असेही उदयनराजेंनी यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिला. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील विविध प्रश्नांबाबत खासदार उदयनराजे आक्रमक झाले आहेत. शुक्रवारी त्यांनी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांची भेट घेतली. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रवी साळुंखे, माजी शिक्षण सभापती सुनील काटकर आणि विविध अधिकारी उपस्थित होते. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी जिल्हा बँकेच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. ‘सातारा जिल्ह्यातील अनेक प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. याबाबत निवेदने दिली, आंदोलने केली, निर्दशने केली. परंतु त्यातील काही प्रश्न तसेच आहेत. नवीन अधिकारी आले की त्यांना प्रश्न सांगायचे आणि कार्यवाही होण्याची वाट पाहायची हे ठरलेले आहे. तरीही मी जिल्ह्याच्या विविध प्रलंबित प्रश्नाच्या सोडवणुकीबाबत आशावादी आहे,’ असे मत खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले. खासदारांनी विविध प्रश्नांबाबत शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांशी भेट घेऊन त्यांच्याशी तब्बल दोन तास चर्चा केली. दरम्यान, १२ फेब्रुवारीला मुंबईत बैठक असून, या बैठकीत प्रलंबित प्रश्नांपैकी अनेक प्रश्न सुटतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात सकाळी ९.३० वाजता सुरू झालेल्या बैठकीत पहिला प्रश्न त्यांनी आंबेडकरांच्या स्मारकांचा मांडला. यावेळी विविध दलित संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
....तर आमने-सामने होऊन जाऊ दे!
‘लोकांच्या प्रश्नांसाठी मी आतापर्यंत लढत आलो असून, इतर लोकप्रतिनिधींपेक्षा जास्त केसेस माझ्यावर आहेत. मला जे प्रश्न विचारतात, ते प्रश्न त्यांनाही विचारा आणि ते जर उत्तर देणार नसतील तर एकदा आमने-सामने होऊन जाऊ दे. मी तर काही ‘अतिरिक्त’ आहे ना,’ असा टोलाही त्यांनी रामराजेंचे नाव न घेता लगावला.
उदयनराजेंनी या केल्या मागण्या
गुंडांच्या संपत्तीची चौकशी करावी
पोलीस अधीक्षकांना मेट्रोपॉलिटिन शहराप्रमाणे कमिशनरचे अधिकार द्यावे
जिल्हा क्रीडा संकुलाच्या दुरवस्था दूर करा
साताऱ्यातील आय.टी.आय मधील कोर्सेसची पुनर्रचना करावी
महाबळेश्वर, पाचगणीतील अनधिकृत बांधकामे
महाबळेश्वर येथील वाहतुकीचा प्रश्न मिटवावा
कऱ्हाड येथील कचऱ्याच्या प्रकल्पावरील स्थगिती उठवावी
उरमोडीजवळचे क्रशर बंद करावे
टेंभू योजनेचे पाणी अडवू नये