जिल्ह्यात पुन्हा मुलींचाच डंका !
By Admin | Updated: June 7, 2016 07:34 IST2016-06-06T23:25:47+5:302016-06-07T07:34:13+5:30
दहावी परीक्षा : ४० हजार ६७६ विद्यार्थी उत्तीर्ण; ९३.५२ टक्के निकाल

जिल्ह्यात पुन्हा मुलींचाच डंका !
सातारा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत सातारा जिल्ह्याने कोल्हापूर विभागात द्वितीय क्रमांक मिळविला. जिल्ह्याचा निकाल ९३.५२ टक्के लागला असून, सर्वाधिक उत्तीर्ण होण्यात मुलींनीच बाजी मारल्याचे चित्र आहे. या परीक्षेत ४० हजार ६७६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च महिन्यात दहावीची परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला. सातारा जिल्हा हा कोल्हापूर विभागात येतो. कोल्हापूर विभागाचा निकाल ९३.८९ टक्के इतका लागला आहे. या विभागात सातारा जिल्ह्याने द्वितीय क्रमांक मिळविला आहे. सर्वाधिक ९४.८४ टक्के इतका निकाल कोल्हापूर जिल्ह्याचा तर सर्वात कमी सांगलीचा निकाल ९२.९६ टक्के इतका लागला आहे. विभागात सर्वाधिक प्रमाणात मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. विभागातील मुलांची उत्तीर्णची टक्केवारी ९२.८१ टक्के असून, मुलींची टक्केवारी ९५.२२ टक्के आहे. मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण २.४१ टक्के इतके अधिक आहे.
जिल्ह्यातील ४३,५५० मुलांपैकी ४३ हजार ४९५ जणांनी परीक्षा दिली होती. प्रत्यक्षात ४० हजार ६७६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या परीक्षेसाठी २३ हजार ७३५ विद्यार्थ्यांपैकी २१ हजार ८८२ जण उत्तीर्ण झाले. १९ हजार ७६० मुली परीक्षेसाठी बसल्या होत्या. त्यापैकी १८ हजार ७९४ उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९२.११ टक्के तर मुलींचे ९५.११ टक्के आहे.
दरम्यान, या परीक्षेत फलटण येथील मुधोजी हायस्कूलच्या मयूर शेंडगे याने ९९ टक्के गुण मिळविले. तसेच साताऱ्यातील महाराजा सयाजीराव विद्यालयातील यश सत्रे याला ९८.४० टक्के, अण्णासाहेब कल्याणी विद्यालयातील प्राजक्ता पवार ९८ टक्के, मुधोजी हायस्कूल फलटणच्या गौरव लखन नाळे ९७.६० टक्के, खटाव येथील लक्ष्मी नारायण इंग्लिश स्कूलमधील जास्मीन झारी ९६.६ टक्के, म्हसवड येथील प.पू. आत्मगिरी माध्यमिक विद्यालयातील संध्या धनवडे ९६.४० टक्के, देऊर येथील मुधाई हायस्कूलच्या अभिजित वेळेकर ९५.८८ टक्के, साताऱ्यातील कन्या शाळेच्या क्रांती भुजबळ ९५.४० टक्के तसेच म्हसवडच्या सिद्धनाथ हायस्कूलच्या अंकिता अब्दागिरे हिने ९४.६० टक्के गुण मिळविले. (प्रतिनिधी)
जिल्ह्यातील दहावी परीक्षेची गुणवत्ता चांगली आहे.
यावर्षी सातारा जिल्हा विभागात दुसरा आला आहे. यापुढे अधिकाधिक विद्यार्थी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण कसे मिळवतील याकडे लक्ष देण्यात येणार आहे. या शैक्षणिक वर्षापासून प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र (माध्यमिक स्तर) हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यामुळे पुढील वर्षी निकाल आणखी चांगला लागलेला दिसेल.
- देवीदास कुलाळ,
शिक्षणाधिकारी माध्यमिक विभाग