सातारा : अभिनेता शाहरुख खान याने देशातील असहिष्णुतेच्या वातावरणाबद्दल केलेल्या टिप्पणीमुळे नाराज झालेल्या शिवसेनेसह काही संघटनांनी ‘दिलवाले’ या त्याच्या चित्रपटास विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर साताऱ्यात हा चित्रपट शुक्रवारी (दि. १८) प्रदर्शितच झाला नाही. ‘दिलवाले’ हा चित्रपट राजलक्ष्मी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार होता. तसेच समर्थ चित्रपटगृहातही मॅटिनीचा खेळ होणार होता. तथापि, गुरुवारीच शिवसेनेने आणि शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेने या चित्रपटाच्या प्रदर्शनाला तीव्र विरोध दर्शविणारी निवेदने दिली होती. त्यामुळे दोन्ही चित्रपटगृहांच्या व्यवस्थापनाने शुक्रवारी चित्रपट प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यासंदर्भात काय भूमिका घेतात, हे पाहून चित्रपट प्रदर्शित करायचा की नाही, याविषयी निर्णय घेतला जाणार आहे. दरम्यान, ‘दिलवाले’ शुक्रवारी वाईत मात्र कोणत्याही विरोधाविना झळकला. शाहरुख खानच्या वक्तव्यावरून नाराजी पसरल्यानंतर उजव्या संघटना सक्रिय झाल्या होत्या. दि. २ नोव्हेंबर रोजी शाहरुखने हे वादग्रस्त वक्तव्य केले होते. ‘धार्मिक असहिष्णुता आणि धर्मनिरपेक्षतेला विरोध हे दोन असे गुन्हे आहेत, जे तुम्ही देशभक्त बनूनही करू शकता,’ असे तो म्हणाला होता. त्यानंतर शिवसेनेसह अनेक संघटनांनी राज्यभरात शाहरुखचा निषेध केला होता. ‘दिलवाले’ प्रदर्शित होऊ द्यायचा नाही, असा निर्णयही घेतला होता. (प्रतिनिधी)
‘दिलवाले’ लागला; पण शाहरुख नाही दिसला
By admin | Updated: December 19, 2015 00:43 IST