दरेखुर्द सजाला तलाठी नसल्याने सजा
By Admin | Updated: January 9, 2015 00:03 IST2015-01-08T21:21:42+5:302015-01-09T00:03:56+5:30
ग्रामस्थांची परवड : चार वर्षांपासून कायमस्वरूपी तलाठीच नाही

दरेखुर्द सजाला तलाठी नसल्याने सजा
कुडाळ : जावळी तालुक्यातील दरेखुर्द सजामध्ये दरे खुर्दसह मोरघर, नरफदेव ग्रामपंचायतींचे महसूल कामकाज चालते. राजकीयदृष्ट्या संवेदनशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दरेखुर्द सजाला गेल्या चार वर्षांपासून कायमस्वरूपी तलाठीच तहसील कार्यालयाकडून मिळाला नाही. त्यामुळे डोंगरमाथ्यावरील नरफदेवसह मोरघर, दरेखुर्द, जावळेवाडी, मोरवाडी ग्रामस्थांची सात बाऱ्यासह इतर कामकाजासाठी परवड होत आहे. तलाठीच नसल्यामुळे ग्रामस्थांना सजा भोगावी लागत आहे. तरी कायमस्वरूपी तलाठी मिळावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.याबाबत माहिती अशी की, दरेखुर्द सजाअंतर्गत मोरेवाडी, जावळेवाडी, मोरघर, धनगरपेठ, नरफदेव गावे येतात. गेल्या चार वर्षांपासून गावाला कायमस्वरूपी गावकामगार तलाठीच महसूल विभागाने दिलेला नाही. तर आता कुठे तांदळे तलाठी देण्यात आला होता. तो देखील प्रांताधिकारी कार्यालयाकडून भूसंपादन विभागात सातारा कार्यालयात त्यांना ठेवण्यात आले आहे. तर सायगाव गावकामगार तलाठी तोडरमल यांच्याकडे हा सजा जोडला आहे. त्यांच्याच सजामध्ये कामे अधिक असल्यामुळे ते दरेखुर्द सजासाठी वेळच देऊ शकत नाहीत. पर्यायी या सजाअंतर्गत येणाऱ्या गावांमधील नागरिकांना उतारा कोतवालाकडून करून घ्यावी लागते.
मात्र, तलाठी सहीसाठी सायगाव गाठून दफ्तर घेऊन कोतवालादेखील सही आणावी लागत असल्यामुळे उतारा मिळवायला सात-सात दिवस विलंब होत आहे. तलाठी नसल्यामुळे धनगरपेठा, नरफदेव ग्रामस्थांना डोंगर उतरून तलाठीच भेटत नसल्यामुळे त्यांची तर नुसतीच पायपीट होत आहे. अनेकदा दरेखुर्द सजाला कायमस्वरूपी तलाठी मिळावा, अशी तहसीलदारांकडे मागणी करूनही या मागणीकडे दुर्लक्ष होत आहे, या सजासाठी स्वतंत्र तलाठी देण्यात यावा, अशी मागणी या सजामधील ग्रामस्थांमधूनच होत आहे. याबाबत प्रांताधिकारी मल्लिकार्जुन माने यांच्याशी संपर्क साधला असता, दरेखुर्द सजासाठी स्वतंत्र गावकामगार तलाठी देण्याची व्यवस्था केली जाईल. नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही, याचीही काळजी घेतली जाईल. (प्रतिनिधी)
कोतवाल बनला ‘तलाठी’
दरेखुर्द सजाला गावकामगार तलाठी नसल्याने या सजाअंतर्गत येणाऱ्या सहा गावांतील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. तर नरफदेव, धनगरपेठा या डोंगरमाथ्यावरील नागरिकांना तलाठी नसल्याचा मोठा फटका बसत आहे. या सजात काम करणाऱ्या कोतवालावर नागरिकांच्या प्रश्नांना तोंड देण्याची वेळ आली आहे. तर महसुली दफ्तरही सांभाळण्याची जबाबदारी पार पाडत. कोतवालाच ‘अण्णासाहेब’ बनले आहे.
दरेखुर्द सजामध्ये एकूण सहा गावे येतात. त्यामुळे प्रभारी तलाठी या गावांना सेवा देऊ शकत नाही. त्यामुळे महसूल विभागाने नागरिकांची गैरसोय ओळखून कायमस्वरूपी तलाठी नियुक्त करावा.
-चंद्रकांत गायकवाड, मोरघर
नागरिक