पर्यटकांकडून प्रवेश अन् प्रदूषण कर डिजिटल पद्धतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:37 IST2021-01-03T04:37:33+5:302021-01-03T04:37:33+5:30

महाबळेश्वर : महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वर पर्यटनस्थळी आलेल्या पर्यटकांना प्रवेशकर व प्रदूषण कर भरण्यासाठी डिजिटल पेमेंट पे ...

Digital entry tax from tourists | पर्यटकांकडून प्रवेश अन् प्रदूषण कर डिजिटल पद्धतीने

पर्यटकांकडून प्रवेश अन् प्रदूषण कर डिजिटल पद्धतीने

महाबळेश्वर : महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वर पर्यटनस्थळी आलेल्या पर्यटकांना प्रवेशकर व प्रदूषण कर भरण्यासाठी डिजिटल पेमेंट पे करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही सुविधा वेण्णालेक टोल नाक्यावर प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली आहे. या योजनेला मिळणारा प्रतिसाद पाहून ही सुविधा पालिकेच्या सर्वच नाक्यांवर उपलब्ध करून दिली जाणार आहे, अशी माहीती मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी दिली.

निसर्ग सौंदर्याने नटलेले महाबळेश्वर पाहण्यासाठी वर्षाकाठी लाखो पर्यटक येथे भेटी देतात. सहलीसाठी आलेल्या पर्यटकांकडून पालिका प्रवेश कर व प्रदूषण कर गोळा करते. हा कर पालिकेच्या उत्पन्नाचे एक प्रमुख स्त्रोत्र आहे. सलग सुटी, शनिवार, रविवार व हंगामात पर्यटकांची येथे गर्दी होते. गर्दीच्या वेळी टोल नाक्यांवर पर्यटकांच्या वाहनांची गर्दी होऊन तेथे वाहतुकीची कोंडी होते. टोल नाक्यांवर वाहनांची गर्दी झाल्याने टोल भरण्यासाठी पर्यटकांचा खूप वेळ जातो. या संदर्भात जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी हिरडा विश्रामगृहावर झालेल्या एका तालुका आढावा बैठकीत पालिकेने पर्यटकांच्या सोईसाठी नाक्यानाक्यावर डिजिटल पेमेंट स्वीकारण्याची सोय करावी अशी सूचना केली होती.

याची दखल घेऊन पालिकेने क्यूआरकोडच्या माध्यमातून पर्यटकांना टोल भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या क्यूआर कोडच्या माध्यमातून पर्यटकांना देशाच्या कोणत्याही ठिकाणी कोड स्कॅन करून पालिकेला टोल भरता येऊ शकतो. या भरलेल्या टोलचा मेसेज पर्यटकाच्या मोबाईलवर व टोल नाक्यावरील पालिकेच्या काही कर्मचाऱ्यांच्या मोबाईलवर येतो. हा मेसेज टोलनाक्यावरील कर्मचाऱ्याला दाखविल्यावर पर्यटकाला तत्काळ प्रवेश मिळेल. पर्यटकांनी या नव्या डिजिटल पेमेंट सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी केले आहे.

फोटो ०२महाबळेश्वर-ट्युरिस्ट

महाबळेश्वर पालिका पर्यटकांकडून डिजिटल पद्धतीने कर वसूल करून घेत आहे. (छाया : अजित जाधव)

Web Title: Digital entry tax from tourists