इस्लामपूर विकास आराखड्यावर सत्ताधाऱ्यांत मतभेद
By Admin | Updated: August 27, 2015 23:14 IST2015-08-27T23:14:58+5:302015-08-27T23:14:58+5:30
विक्रम पाटील : महिन्याभरात आराखड्यास मंजुरी, राष्ट्रवादीला विरोधकांनी दिले आव्हान

इस्लामपूर विकास आराखड्यावर सत्ताधाऱ्यांत मतभेद
अशोक पाटील -इस्लामपूर
शहराच्या नियोजित विकास आराखड्याबाबत पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील काहीही बोलण्यास तयार नाहीत. मात्र पालिकेकडून आराखड्यासंदर्भात सर्व पूर्तता करण्यात आली आहे. तो कधी मंजूर होईल, याबाबत काही माहीत नाही, असे ते सांगतात, तर नगराध्यक्ष सुभाष सूर्यवंशी आराखडा सात दिवसात मंजूर होणार असल्याचे स्पष्ट करतात. भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रमभाऊ पाटील मात्र विकास आराखडा मंजूर व्हायला महिना तरी लागेल, असे सांगत सत्ताधाऱ्यांना आव्हान देत आहे.
सत्ताधारी राष्ट्रवादी आणि नगरपालिका प्रशासनाच्या आठमुठ्या धोरणामुळे विकास आराखड्याचे तीनतेरा वाजले आहेत. १९८० नंतरच्या विकास आराखड्याला अजूनही मुहूर्त लागलेला नाही. या आराखड्यावर पालिकेने लाखो रुपये उधळूनही त्याला अंतिम स्वरूप आलेले नाही. सध्या हा आराखडा नगरविकास खात्याकडे मंजुरीसाठी प्रतीक्षेत आहे. तो मंजूर होण्यासाठी माजी ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी वजन खर्ची टाकल्याचे समजते. त्यातील त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांनी गोपनीयरित्या केला असून, त्याला अंतिम मंजुरी मिळण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्याला यश आल्याचेही समजते. परंतु या आराखड्यास कधी मंजुरी मिळणार, याबाबत सत्ताधाऱ्यांमध्येच मतभिन्नता आहे.
राज्यात व केंद्रात भाजपचे सरकार आहे. त्यामुळे नगरविकास खाते राष्ट्रवादीच्या नेत्यांना विकास आराखड्यासाठी उभेही करत नाही, असा आरोप भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पाटील यांनी केला आहे. तथापि त्यांच्याच मदतीने सत्ताधाऱ्यांतील काही नेते हा आराखडा मंजूर करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. याचा विक्रम पाटील यांनी इन्कार केला आहे. विकास आराखड्यातील काही अन्यायी आरक्षणे काढूनच येत्या महिन्याभरात तो मंजूर होणार असल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.
या आराखड्याबाबत सत्ताधाऱ्यांसह विरोधकांतही मतभिन्नता आहे. ज्यावेळी आराखडा मंजूर होऊन तो प्रसिध्द होईल, त्यावेळीच शहर मोकळा श्वास घेईल. त्याचवेळी गुंठेवारीचाही प्रश्न मार्गी लागणार आहे.
विकास आराखड्याला अंतिम मंजुरी देण्याचे अधिकार महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास खात्यास आहेत. तो कधी मंजूर होईल, याबाबत आपणास काहीही सांगता येणार नाही. आराखडा मंजूर झाल्यानंतर तो शासन संकेतस्थळावर प्रसिध्द करेल. त्यावेळीच याबाबतची माहिती देता येईल.
- दीपक झिंजाड, मुख्याधिकारी, इस्लामपूर, नगरपरिषद