महामार्गावर डिझेल चोरी करणारी टोळी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:42 IST2021-09-03T04:42:09+5:302021-09-03T04:42:09+5:30
वेळे : गेल्या अनेक दिवसांपासून सातारा ते पुणे या महामार्गावर रात्री-अपरात्री हॉटेल आणि ढाबे या ठिकाणी विश्रांतीसाठी उभ्या असलेल्या ...

महामार्गावर डिझेल चोरी करणारी टोळी जेरबंद
वेळे : गेल्या अनेक दिवसांपासून सातारा ते पुणे या महामार्गावर रात्री-अपरात्री हॉटेल आणि ढाबे या ठिकाणी विश्रांतीसाठी उभ्या असलेल्या वाहनांमधून डिझेल चोरीचे प्रकार घडत होते. परंतु भुईंज पोलिसांना या डिझेल चोरांच्या मुसक्या आवळण्यात यश मिळाले.
सातारा-पुणे महामार्गावरील वेळे येथील हॉटेल आसरा या ठिकाणी बुधवारी पोलिसांनी वेळे ग्रामस्थांच्या मदतीने रात्री बारानंतर सापळा लावला होता. याचदरम्यान पोलिसांनी लावलेल्या सापळ्यात आसरा हॉटेल येथे उभ्या असलेल्या टेम्पोमधून डिझेल चोरी करून ते कॅनमध्ये भरत असताना या टोळीवर रात्र गस्तीवर असणारे भुईंज पोलिसांनी मध्यरात्री तीन वाजण्याच्यासुमारास या टोळीवर झडप घातली असता, एका आरोपीस पकडण्यात यश आले. पण या डिझेल टोळीपैकी अंधाराचा फायदा घेऊन तिघे पळून जाण्यात यशस्वी ठरले. घटनास्थळावर सापडलेला एक मोबाईल आणि पकडलेला एक आरोपीला पोलिसी हिसका दाखवताच त्याने पळून गेलेल्या सहकाऱ्यांची नावे पोलिसांना सांगितली आहेत. पळून गेलेल्या आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक त्यांच्यापर्यंत पोहोचले असून, लवकरच त्यांना अटक केली जाईल, अशी माहिती भुईंजचे सहायक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे यांनी दिली. संबंधिताकडून अंदाजे पंचवीस हजार रुपये किमतीचे साडेतीनशे लिटर डिझेलने भरलेले कॅन हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. ही टोळी वाहनचालक झोपलेले असताना मध्यरात्री गेल्या कित्येक दिवसांपासून चोरीचा व्यवसाय करत असल्याची कबुली आरोपीने दिली.