जागा चुकीची ते आधी समजले नाही का?

By Admin | Updated: June 17, 2016 00:22 IST2016-06-17T00:02:48+5:302016-06-17T00:22:19+5:30

उदयनराजेंचा सवाल : तांबवेतील पडलेल्या टाकीची केली पाहणी

Did not understand the space wrong? | जागा चुकीची ते आधी समजले नाही का?

जागा चुकीची ते आधी समजले नाही का?

कऱ्हाड/तांबवे : तांबवेतील पाणी योजनेची पडलेली टाकी ठेकेदाराने नव्याने बांधून द्यावी. तसेच याप्रकरणी क्वालिटी कंट्रोलची तपासणी करण्यात येईल. त्यामध्ये दोषी आढळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय येथील पंचायत समितीच्या बैठकीत घेण्यात आले.
दरम्यान, खासदार उदयनराजे भोसले यांनी गुरुवारी तांबवे येथे भेट देऊन पाण्याच्या टाकीची पाहणी केली. तसेच त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. जागा चुकीची आहे हे टाकी उभारण्यापूर्वी समजले नाही का, अशा शब्दात त्यांनी अधिकाऱ्यांना खडसावले.
पंचायत समितीचे सभापती देवराज पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत गटविकास अधिकारी अविनाश फडतरे, सरपंच संतोष कुंभार, उपसरपंच धनंजय ताटे, सदस्य प्रदीप पाटील, आबासाहेब पाटील, जावेद मुल्ला, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे मुल्ला, ग्रामविकास अधिकारी प्रमोद ठोके उपस्थित होते.
बैठकीमध्ये सभापती पाटील यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांकडून झालेल्या घटनेची वस्तुस्थिती जाणून घेतली. जिल्हाधिकाऱ्यांनी सांगूनही जीवन प्राधिकरणचे वरिष्ठ अधिकारी बैठकीस उपस्थित राहीले नसल्याबाबत गटविकास अधिकारी फडतरे यांनी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर ग्रापंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची बाजू मांडली. त्यामध्ये संबंधित टाकी नवीन उभारून द्यावी, नुकसानग्रस्त गाड्यांची भरपाई देण्यात यावी, सर्व योजनेची स्वतंत्र यंत्रणेमार्फत तपासणी करण्यात यावी, अशी मागणी पदाधिकारी व सदस्यांनी केली. या योजनेचे ठेकेदार जानुगडे यांनी संबंधित योजनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून टाकी नव्याने बांधून देणार असल्याची ग्वाही दिली. सभापती पाटील यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधीक्षक अभियंता यमगर यांच्याशी संपर्क साधून संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून पुढील कार्यवाही तातडीने करण्यास सांगितले. बैठकीमध्ये पाणी योजनेच्या पडलेल्या टाकीप्रकरणी क्वालिटी कंट्रोलची तपासणी करण्यात येईल. त्याचबरोबर याप्रकरणी दोषी आढळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी. पडलेली टाकी ठेकेदारांनी नव्याने बांधून द्यावी, असे ठरवण्यात आले.
खासदार उदयनराजे भोसले यांनी गुरुवारी पाण्याच्या टाकीची पाहणी केली. त्यावेळी बांधकामातच कमी दर्जाचे साहित्य वापरण्यात आल्याचे दिसून आले. त्यामुळे उदयनराजे यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. ठेकेदारांसह दोषींवर कडक कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
टाकी चुकीच्या जागी बांधण्यात आल्याचे एका अधिकाऱ्याने यावेळी सांगितले. त्यावेळी टाकी बांधण्यापूर्वी तुम्हाला हे समजले नाही का, असा प्रतीप्रश्न उदयनराजे यांनी केला. उदयनराजेंच्या या प्रश्नावर अधिकारी गप्प झाले. (प्रतिनिधी/वार्ताहर)

Web Title: Did not understand the space wrong?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.