‘लोकमत’च्या चळवळीला ढोलांचा सलाम!
By Admin | Updated: October 11, 2015 00:07 IST2015-10-11T00:04:38+5:302015-10-11T00:07:25+5:30
गांधी मैदानात ‘ढोलोत्सव’ रंगला : शेकडो कलाकारांचा सहभाग; ढोलांच्या गजरात ताशांचा कडकडाट !

‘लोकमत’च्या चळवळीला ढोलांचा सलाम!
सातारा : पारंपरिक वाद्यांच्या गजरात थाटात विसर्जन मिरवणूक काढून सातारकरांनी इतिहास घडविला. तमाम सातारकरांना मानाचा मुजरा करण्यासाठी ‘लोकमत आणि गंधतारा ढोल्स’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ढोल महोत्सवाला शनिवारी संध्याकाळी गांधी मैदानावर उदंड प्रतिसाद मिळाला. तीनशेहून अधिक कलाकारांच्या संचाने हे सादरीकरण केले.
ऐतिहासिक गांधी मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष सचिन सारस, सुर्वेज हॉटेलचे माधव सुर्वे, गणेश घोलप व इतर मान्यवर उपस्थित होते.
साताऱ्यात पूर्वंपार ढोल-ताशांची सेवा करणाऱ्या दीक्षित करंडेढोल मंडळाने आपल्या वादनाने या महोत्सवाची सुरुवात केली. सातारा शहरातील सहा मंडळांच्या उपस्थितीने या महोत्सवाला रंगत आणली. वर्षानुवर्षे पारंपरिक वाद्यांची सेवा करणाऱ्या मंडळांचा पहिल्यांदाच असा गौरव करण्यात आला.
‘गंधतारा ढोल्स’च्या संचात ८० महिला आणि ३० पुरुष आहेत. लयबद्ध वादन, ढोलावर थाप आणि ताशांचा कडकडाट अशा नादावणाऱ्या वातावरणात रात्री उशिरापर्यंत हा सोहळा रंगला होता. सातारकरांनीही अखेरपर्यंत थांबून कलाकारांना प्रोत्साहन दिले. टाळ्यांचा कडकडाट आणि शिट्ट्यांनी गांधी मैदान परिसर दणाणून गेला.
या महोत्सवासाठी शार्दुल टोपे, सलमान सय्यद, प्रतिक जाधव, सौरभ शिंदे, रोहित सावंत, चेतन यादव, सर्वेश खांडेकर, आकाश गायकवाड, आकाश निंबाळकर, आकाश पिसाळ, महेश गायकवाड यांनी विशेष परिश्रम केले.
विधायक पत्रकारितेचे व्रत घेतलेल्या ‘लोकमत’ने यंदा डॉल्बी सिस्टीम बंदीचा नारा दिला होता. त्यातून तयार झालेल्या एल्गाराने यंदा डॉल्बी सिस्टीमचा आवाज सातारा जिल्ह्यातून हद्दपार झाल्याचे सुखावह चित्र पहायला मिळाले.
विधायक कामात सर्वस्व झोकून देऊन काम करणाऱ्या अनेक युवकांनी स्वत: पुढाकार घेऊन काही ढोल पथकांची स्थापना केली. नोकरी, व्यवसाय आणि शिक्षण या रगाड्यात असलेल्या तरुणाईने रोज ढोलाच्या सरावासाठी चार तास काढले. (प्रतिनिधी)
साताऱ्याच्या इतिहासात पहिल्यांदाच!
सातारा शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच ढोल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे हा महोत्सव नेमका कसा असणार, याविषयी सातारकरांच्या मनात उत्सुकता होती. गांधी मैदानावरील व्यासपीठावर केलेली आकर्षक मांडणी आणि विद्युत रोषणाईने कार्यक्रमात रंगत आणली.
८० महिला अन् ३० पुरुष यांचा समावेश
‘गंधतारा ढोल्स’च्या संचात ८० महिला आणि ३० पुरुष आहेत. लयबद्ध वादन, ढोलावर थाप आणि ताशांचा कडकडाट अशा नादावणाऱ्या वातावरणात शनिवारी रात्री उशिरापर्यंत हा सोहळा रंगला होता. हजारो सातारकरांनीही अखेरपर्यंत थांबून या कलाकारांच्या पारंपरिक कलेला जोरदार प्रोत्साहन दिले. नेहमी डॉल्बीवरच्या गाण्यांना मिळणारा टाळ्यांचा कडकडाट आणि शिट्ट्या शनिवारी मात्र ताशांच्या कडकडाटाला मिळाला.
अन् गांधी मैदान परिसर दणाणून गेला.