साताऱ्यात शनिवारी ‘ढोल महोत्सव’
By Admin | Updated: October 6, 2015 23:46 IST2015-10-06T21:49:00+5:302015-10-06T23:46:13+5:30
गांधी मैदान : सातारकरांसाठी खास पर्वणीचे आयोेजन

साताऱ्यात शनिवारी ‘ढोल महोत्सव’
सातारा : पारंपरिक वाद्यांच्या गजरात थाटात निघालेल्या गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीचे गोडवे आजही सातारा शहरात गायले जात आहेत. याच सातारवासीयांसाठी ‘गंधतारा ढोल्स’च्या वतीने शनिवारी ढोल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
विधायक पत्रकारितेचे व्रत घेतलेल्या ‘लोकमत’ने डॉल्बी सिस्टीम बंदीचा नारा दिला. त्याविषयी सुमारे एक वर्षे प्रशासकीय, गणेशोत्सव मंडळे आणि कार्यकर्त्यांचा पाठपुरावाही ‘लोकमत’च्यावतीने करण्यात आला. त्यातून तयार झालेल्या एल्गाराने यंदा डॉल्बी सिस्टीमचा आवाज सातारा जिल्ह्यातून हद्दपार झाल्याचे सुखावह चित्र पहायला मिळाले.
विधायक कामात सर्वस्व झोकून देऊन काम करणाऱ्या अनेक युवकांनी स्वत: पुढाकार घेऊन काही ढोल पथकांची स्थापना केली. नोकरी, व्यवसाय आणि शिक्षण या रगाड्यात असलेल्या तरुणाईने रोज ढोलाच्या सरावासाठी चार तास काढले. त्यांच्या या कष्टाचे फळ सातारकरांच्या चेहऱ्यावरून पहायला मिळाले. कित्येक दशकांनी अनेक ज्येष्ठांचे पाय चक्क विसर्जन मिरवणुकीच्या दिशेने वळालेलेही पहायला मिळाले.सातारकरांचे अलोट प्रेम आणि पारंपरिक वाद्यांप्रती असलेल्या निष्ठेपायी ‘गंधतारा ढोल्स’च्या वतीने शनिवार, दि. १० आॅक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता गांधी मैदान येथे ढोल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.विसर्जन मिरवणूक चुकलेले आणि पुन्हा एकदा ढोलांच्या वातावरणाचा आनंद देण्यासाठी ‘गंधतारा’चा ताफा ढोल वाजवणार आहे. रसिक सातारकरांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन ‘लोकमत’ व ‘गंधतारा’च्या वतीने करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)