ढेबेवाडी विभाग पुन्हा कोरोनाच्या दहशतीखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:37 IST2021-03-25T04:37:43+5:302021-03-25T04:37:43+5:30
कोरोनाचा प्रादुर्भाव गत दोन, तीन महिन्यात घटला होता; मात्र विभागातील सळवे, सणबूर, काळगाव, तळमावले या प्राथमिक आरोग्य केंद्रापैकी सणबूर, ...

ढेबेवाडी विभाग पुन्हा कोरोनाच्या दहशतीखाली
कोरोनाचा प्रादुर्भाव गत दोन, तीन महिन्यात घटला होता; मात्र विभागातील सळवे, सणबूर, काळगाव, तळमावले या प्राथमिक आरोग्य केंद्रापैकी सणबूर, काळगाव, तळमावले आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात नव्याने रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली आहे. विभागासाठी ही धोक्याची घंटा आहे. तळमावले येथील एक शिक्षक बाधित सापडले होते. त्यानंतर सर्व ४३ शिक्षक व कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली आहे. कुंभारगाव, शेंडेवाडी, गलमेवाडी अशा काही गावात बाधित सापडले आहेत. गुढे येथे नुकताच एक रुग्ण सापडला आहे. गुढेकरांची चिंता त्यामुळे वाढणार आहे. बहुतांश मुंबई अथवा परजिल्हा रहिवासी असले तरी हे स्थानिक जनतेच्यादृष्टीने धोकादायक आहे. काळगाव येथील कोळगेवाडी येथेही एक जण बाधित सापडला. तोसुद्धा मुंबई रिटर्न आहे. सध्या तो होम आयसोलेट आहे.
सणबूर आरोग्य केंद्राखालील मंद्रुळकोळे येथे नव्याने पुन्हा रुग्ण सापडला आहे. त्याच्या नातेवाईकांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. तर ढेबेवाडी येथील एका राष्ट्रीयीकृत बँकेचा एक कर्मचारी बाधित सापडला आहे. संबंधित बँकेचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या; तसेच त्यांच्या सहवासात आलेल्या ग्राहकांची धास्ती वाढवणारी ही घटना आहे. सदर कर्मचारीही परजिल्ह्यातीलच आहे.
तळमावले, ढेबेवाडी हे आठवडा बाजार मोठ्या प्रमाणात गर्दीचे असतात; मात्र बाजारात कोरोना नियमांचे पालन होताना दिसत नाही. संबंधित ग्रामपंचायत, आरोग्य यंत्रणा व पोलिसांनी याबाबत कडक भूमिका घेत नियमांचे पालन होईल, याबाबत दक्षता घेण्याची गरज आहे.
- चौकट
लसीकरण करण्याचे आवाहन
दरम्यान तळमावले, काळगाव, ढेबेवाडी ग्रामीण रुग्णालयात कोरोना लसीकरण सुरू आहे. संबंधितानी आपली नोंदणी करून लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन आरोग्य यंत्रणेकडून केले जात आहे.
- कोट
ढेबेवाडी येथील राष्ट्रीयीकृत बँकेचा एक कर्मचारी कोरोना बाधित सापडल्याने ती बँक मंगळवार ते गुरुवार अशी तीन दिवस बंद ठेवण्यात आली आहे. कोरोना संक्रमण रोखण्यासाठी ग्रामपंचायत पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. ग्रामस्थांनी प्रशासकीय नियमांचे पालन करावे.
- अमोल पाटील, सरपंच, मंद्रुळकोळे.