धनगर समाजाचा वापर फक्त मतांसाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:44 IST2021-09-14T04:44:51+5:302021-09-14T04:44:51+5:30
कऱ्हाड : धनगर समाजाची ताकद खूपच मोठी आहे. पण सर्वच राजकीय पक्षांनी आजवर धनगर समाजाचा केवळ मतांसाठीच ...

धनगर समाजाचा वापर फक्त मतांसाठी
कऱ्हाड : धनगर समाजाची ताकद खूपच मोठी आहे. पण सर्वच राजकीय पक्षांनी आजवर धनगर समाजाचा केवळ मतांसाठीच वापर करून घेतला आहे, असा आरोप ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांनी केला.
पाटण तालुक्यातील सडावाघापूर, सडाबोडकेवाडी, सडा निनाई, सडा कडकी येथे धनगर समाजाने आयोजित केलेल्या गुणवंत विद्यार्थी सत्कार व कोविड योद्धा पुरस्कार व अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्टच्यावतीने शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमात काकडे बोलत होते. यावेळी १) सडावाघापूर ९५ (२), सडा बोडकेवाडी ३५. (३) सडाकळकी ४१ (४) सडा निनाई ४६, एकूण २१७ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. राम झोरे अध्यक्षस्थानी होते.
काकडे म्हणाले, धनगर समाजाची भावना कोणत्याच राजकीय पक्षांनी ओळखली नसल्याने आजही धनगर समाज आरक्षणापासून वंचित राहिला आहे. येत्या निवडणुकीपूर्वी धनगर समाजाला एस टी आरक्षण देण्याबाबत योग्य ती भूमिका घेतली नाही तर आगामी निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. कोणत्याच राजकीय पक्षाच्या आजी-माजी मुख्यमंत्र्यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रस्ताव केंद्रांकडे पाठवला नाही. घनगर समाजाच्या एस टी आरक्षणाची मागणी ही गेली ७० वर्षांपासूनची असून, धनगर व धनगड या दोन शब्दांचा विपर्यास अर्थ काढून आमच्या आरक्षणाची मागणी मुद्दाम लांबणीवर टाकण्याचे काम सर्वच राजकीय नेतेमंडळींनी केले असून, प्रत्येक राजकीय पक्षांनी धनगर समाजाचा ‘वापरा आणि फेका’ ही नीती वापरल्याने धनगर समाजाचे खूप मोठे नुकसान झाले.
धनगर समाजाला आजही डोंगर, दऱ्या-खोऱ्यातील गोरगरीब समाजबांधव यांना कोणत्याच सुविधा उपलब्ध नाहीत. रस्ता, वीज, आरोग्य या सुविधांपासून वंचित ठेवण्याचे काम व धनगर समाजाला अंधारात ठेवण्याचे काम राजकीय नेते करीत आहेत. धनगर समाजाने इथुनपुढे स्वार्थी राजकीय नेतेमंडळींपासून सावध राहावे, धनगर समाजाने लाचारी आणि गुलामगिरी सोडली, तर समाजाचा सर्वांगीण विकास करता येईल.
प्रास्ताविक रघुनाथ दंडिले यांनी केले, तर आभार सरपंच बापूराव दंडिले यांनी मानले. विजय यमकर, विजय ताटे, रामचंद्र यमकर, जयराम शिंदे, बबन ऐर, बबन झोरे, आनंदा आंग्रे. जगन्नाथ शेळके, कोंडिबा झोरे, बापूराव झोरे, भैरू झोरे व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी राम झोरे, विजय यमकर, बापूराव दंडिले, विजय ताटे यांचीही भाषणे झाली.
फोटो
सडावाघापूर (ता. पाटण) येथील कार्यक्रमात बोलताना प्रवीण काकडे.