गणेशवाडीत धुमश्चक्री; दोन गंभीर
By Admin | Updated: August 6, 2015 00:41 IST2015-08-06T00:33:42+5:302015-08-06T00:41:04+5:30
निमसोडला जातिवाचक शिवीगाळ : ग्रामपंचायत निवडणूक वादातून वेगवेगळ्या घटना

गणेशवाडीत धुमश्चक्री; दोन गंभीर
वडूज : ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादावरून खटाव तालुक्यातील गणेशवाडी-पिंपळवाडी येथे मंगळवारी रात्रीच्या सुमारास दोन गटांत जोरदार धुमश्चक्री झाली. यामध्ये दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत, तर निमसोड येथील प्रकरणात जातिवाचक शिवीगाळ व जबरी चोरीबाबत परस्परविरोधी तक्रारी झाल्या आहेत. विशेष म्हणजे, ग्रामपंचायतीच्या मतदानादिवशीच या घटना घडल्या आहेत.
याबाबत माहिती अशी की, मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास गणेशवाडी ग्रामपंचायतीअंतर्गत असणाऱ्या पिंपळवाडीत मत न दिल्याच्या कारणावरून जोरदार धुमश्चक्री झाली. यामध्ये गुणवंत राजाराम गलांडे, वसंत दगडू गलांडे यांच्या डोक्यात व पाठीत काठी, चाकूचे वार झाल्याने ते गंभीररीत्या जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सातारा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी जनार्दन राजाराम गलांडे यांनी विजय नारायण गलांडे, गणेश दत्तू गलांडे, विशाल नारायण गलांडे, विकास नारायण गलांडे, विक्रम नारायण गलांडे, नारायण किसन गलांडे, युवराज सदाशिव गलांडे, अभिजित जालिंदर गलांडे, नंदाबाई नारायण गलांडे, मालन हणमंत गलांडे, अशोक मारुती गलांडे, मारुती बजिरंग गलांडे (सर्व रा. पिंपळवाडी) यांच्या विरोधात वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.
तर विश्वास हणमंत गलांडे यांनी समीर राजाराम गलांडे, गुणवंत राजाराम गलांडे, जनार्दन राजाराम गलांडे, राजाराम सीताराम गलांडे, बिराजी वसंत गलांडे, रामचंद्र पांडुरंग गलांडे, सागर वसंत गलांडे, संजय विलास गलांडे, अशोक विलास गलांडे, ब्रह्मा हिंदुराव गलांडे, शीतल जनार्दन गलांडे, अश्विनी गुणवंत गलांडे, वंदना सुनील गलांडे यांच्या विरोधात ‘मतदान केले नाही,’ या कारणावरून चिडून जाऊन लाकडी दांडक्याने मारहाण करीत बेकायदा जमाव जमविल्याचा गुन्हा नोंद केला आहे. ही मारहाणीची घटना आमदार जयकुमार गोरे व शेखर गोरे समर्थक गटांत घडली. (प्रतिनिधी)
सोन्याची चेन जबरदस्तीने हिसकावली!
निमसोड येथे ‘आमच्या भावाच्या विरोधात उमेदवार का दिला?,’ या कारणावरून शेखर गोरे समर्थक पॅनेलचे उमेदवार श्रीकांत देवकर यांचे मतदान प्रतिनिधी दीपक सुरेश खिलारे यांना दिगंबर सयाजी देशमुख, गुरुनाथ अमृत देशमुख, महेश मोहन देशमुख, महावीर मोहनराव देशमुख या चौघाजणांनी जातिवाचक शिवीगाळ करून दमदाटी केली, अशी फिर्याद पोलिसांत देण्यात आली आहे. संतोष बाजीराव देशमुख यांनी श्रीकांत बाळू देवकर, दीपक सुरेश खिलारे, मयूर तात्याबा निकाळजे, नानासाहेब रामचंद्र घाडगे यांच्या विरोधात सोन्याची चेन जबरदस्तीने हिसकावून नेल्याची फिर्याद देण्यात आली आहे. ही घटना शेखर गोरे समर्थक आणि रणजितसिंह देशमुख यांच्या गटांत घडली.