विज्ञानाचा आधार नसलेली भक्ती केवळ अंधश्रद्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:26 IST2021-07-20T04:26:33+5:302021-07-20T04:26:33+5:30
सातारा : अनेक ईश्वर नाहीत, एकच ईश्वर आहे आणि तो म्हणजे विठ्ठल, एकेश्वरवादामुळे अंधश्रद्धा संपते. ज्या भक्तीला विवेकाची जोड ...

विज्ञानाचा आधार नसलेली भक्ती केवळ अंधश्रद्धा
सातारा : अनेक ईश्वर नाहीत, एकच ईश्वर आहे आणि तो म्हणजे विठ्ठल, एकेश्वरवादामुळे अंधश्रद्धा संपते. ज्या भक्तीला विवेकाची जोड नाही आणि विज्ञानाचा आधार नाही, ती भक्ती अंधश्रद्धा म्हणून नावारूपाला येते. शोषण, व्यसनाधिनता, स्वैराचार, भ्रष्टाचार, अंधश्रद्धा या सर्व सामाजिक रोगांविरोधात संतांनी विचार दिले आहेत. देव प्राप्त करण्यासाठी वैदिक कर्मकांडाच्या अंधश्रद्धा संतांनी नाकारल्या, असे मत डॉ. सुहास महाराज फडतरे यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आयोजित आषाढी वारीनिमित्त ‘विवेकाची वारी’ या तीनदिवसीय ऑनलाईन व्याख्यानमालेचा शनिवारी दुसरा दिवस होता. शनिवार, १७ जुलै रोजी सुप्रसिद्ध कीर्तनकार डॉ. सुहास फडतरे महाराज, (कोरेगाव, सातारा) यांचे ‘अंधश्रद्धा निर्मूलनासाठी संतांचा जागर’ या विषयावर व्याख्यान पार पडले.
यावेळी डॉ. फडतरे म्हणाले, ‘वारीमध्ये फक्त देव प्रसन्न व्हावा म्हणून लोक पायी चालत नाहीत. वारीमध्ये संतांच्या विचारांचा जागर होतो. समाजाचं नेमकं प्रबोधन होण्यासाठी आणि अंध परंपरेची जळमटे दूर करण्यासाठी आम्ही विविध संत साहित्य गात पुढे जातो. पंढरपूर हे संतांच्या विवेकी विचारांचे माहेर आहे आणि तेथे सर्व संतांचे विचार आम्हाला मिळतात म्हणून आम्ही ही वारी करतो.’
संत साहित्यामध्ये गरीब-श्रीमंत ही विषमतासुद्धा समोर येते, याचे उदाहरण देताना फडतरे महाराज हे संत नामदेवांचा एक अभंग सांगतात, ‘तुम्हा घरी चोळी लुगडी, आम्हा घरी पोरे उघडी; तुम्हा घरी गाई म्हशी, आम्हा घरी उंदीर घुशी’.
‘संतांचे साहित्य वैदिक कर्मकांडाला फाटा देऊन समतावादी पर्याय देते आणि फक्त नामस्मरणातून ईश्वरप्राप्तीचा मार्ग समजावून सांगितला. जो ज्ञानाचा द्वेष करतो, जो आळशी असतो तो अंधश्रद्धेला बळी पडताे. या समाजाला अज्ञानी ठेवून लूट केली जाते. म्हणून समाजाला ज्ञानी करण्यासाठी संत पुढे आले पण त्यांनी चमत्कार केले नाहीत, त्यांनी प्रबोधन केले,’ असे शेवटी फडतरे महाराज म्हणाले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वराज आणि महेश धनवटे यांनी संत सावता माळी यांचा अभंग सादर केला. सम्राट हटकर यांनी प्रास्तविक केले. रामभाऊ डोंगरे यांनी परिचय करून दिला. सुजाता म्हेत्रे यांनी सूत्रसंचालन केले तर निशा भोसले यांनी आभार मानले.