हद्दवाढीच्या विकासासाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:38 IST2021-09-13T04:38:45+5:302021-09-13T04:38:45+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : पंचायत समिती व जिल्हा परिषदेला शाहुपूरी, विलासपूर, खेड या ग्रामपंचायतींकरीता प्राप्त झालेला ...

For the development of boundaries | हद्दवाढीच्या विकासासाठी

हद्दवाढीच्या विकासासाठी

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : पंचायत समिती व जिल्हा परिषदेला शाहुपूरी, विलासपूर, खेड या ग्रामपंचायतींकरीता प्राप्त झालेला २ कोटी ३० लाखांचा निधी नगरपरिषदेकडे वर्ग करण्यास ग्रामीण विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी मंजुरी दिली आहे. अशी माहिती सातारा विकास आघाडीचे अध्यक्ष व खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली आहे.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे की, केंद्राने ग्रामीण विकासाकरीता पंधराव्या वित्त आयोगातून बंधीत निधीचा पहिला हप्ता, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद स्तराकरीता १०:१०:८० या प्रमाणात वितरित केला होता. दरम्यानच्या काळात संपूर्ण शाहुपूरी, विलासपूर, खेड, दरे या ग्रामपंचायतींचा भाग नगरपालिकेत समाविष्ट करून सातारा शहराच्या हद्दवाढीचा प्रस्ताव शासनाने मंजूर केला.

तत्पूर्वी जुन्या ग्रामपंचायतींच्या विकासाकरीता पंधराव्या वित्त आयोगातील पंचायत समिती आणि जिल्हा परिषद स्तरावरील अनुक्रमे १० टक्के आणि ८० टक्के निधी संबंधित यंत्रणेकडेच जमा होता. आता हद्दवाढीत समाविष्ट झालेल्या भागाचा विकास पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद करू शकत नसल्याने, या भागाच्या विकासाकरीता त्यांचा हिस्सा नगरपरिषदेकडे वर्ग करण्याबाबत मंत्री मुश्रीफ यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार २ कोटी ३० लाखांचा निधी पालिकेकडे वर्ग करण्यास मंत्री मुश्रीफ यांनी मंजुरी दिली आहे. लवकरच हद्दवाढीतील विकासाकरीता सुमारे अडीच कोटी निधी उपलब्ध होत असल्याने, अतिआवश्यक कामे पूर्ण होण्यास कोणतीही समस्या उद्भवणार नाही, असेही पत्रकात नमूद केले आहे.

Web Title: For the development of boundaries