स्वच्छतागृहात घाण केली म्हणून चक्क रुग्णांना दंड!

By Admin | Updated: April 21, 2015 01:00 IST2015-04-21T00:42:35+5:302015-04-21T01:00:45+5:30

पाटण ग्रामीण रुग्णालय : साफसफाईसाठी प्रत्येकी शंभर रुपये

Deterioration in the sanitary latrine so far! | स्वच्छतागृहात घाण केली म्हणून चक्क रुग्णांना दंड!

स्वच्छतागृहात घाण केली म्हणून चक्क रुग्णांना दंड!

अरुण पवार -पाटण  --वैद्यकीय अधीक्षक आणि कर्मचारी यांच्यातील वादात पाटण ग्रामीण रुग्णालयाचा कारभार अडकलेला असतानाच आता वेगळ्याच वादाला तोंड फुटले आहे. रुग्णालयातील आंतररुग्ण विभागातील रुग्णांकडून आणि प्रसूती झालेल्या महिलांकडून शौचालय व स्वच्छतागृहात घाण केली म्हणून साफसफाईसाठी प्रत्येकी शंभर रूपये वसूल केल्याचा प्रकार घडला. त्याची पावती दिली असून त्यावर कोणत्या कारणासाठी वसूली केली याबाबत मात्र कसलाच उल्लेख केलेला नाही. मोफत सेवा दिल्या जाणाऱ्या शासकीय रुग्णालयात जर रुग्णांकडून अशी नियमबाह्य वसुली होत असेल तर तो अन्याय आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया रुग्णांमधून उमटत आहे.तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या रुग्णांची काळजी घेणारे शासकीय रुग्णालय म्हणून पाटण रुग्णालयाकडे पाहिले जाते. तरीही डॉक्टर व कर्मचारीच रुग्णांना त्रासदायक ठरत असल्यामुळे या रुग्णालयाबाबत सतत तक्रारी होत आहेत.


वैद्यकीय अधिकारी विरुद्ध कर्मचारी
गेल्या महिनाभरापासून पाटण ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षकविरुद्ध कर्मचारी असा वाद निर्माण होऊन संप, आंदोलने झाली. या वादामुळे रुग्णांचे हाल झाले. याबाबत आमदार शंभूराज देसाई यांनी रुग्णालयात बैठक घेऊन हा वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. तसेच रुग्णांना चांगली सेवा देण्याबाबत आदेशही दिला. मात्र, त्याही पुढे जाऊन रुग्णांकडूनच शंभर रुपये वसुली करण्याचा प्रकार घडला.


रुग्णांनी शौचालय व स्वच्छतागृहात घाण केली होती. त्यामुळे ते तुंबले होते. त्याची सफाई करण्यासाठी रुग्णांकडून शंभर रुपये वसूल केले. त्याच्या पावत्या दिल्या आहेत. रुग्णांना शिस्त लागावी म्हणून दंड वसूल केला आहे. एवढाच यामागचा हेतू आहे.
- डॉ. पी. एल. वाघमारे,
वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, पाटण

Web Title: Deterioration in the sanitary latrine so far!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.