जुने कवठेतील वाळू ठेका उद्ध्वस्त
By Admin | Updated: June 8, 2015 00:51 IST2015-06-07T23:27:28+5:302015-06-08T00:51:37+5:30
प्रांताधिकाऱ्यांची कारवाई : ३१ ट्रक मालकांना १७ लाखांचा दंड; ट्रक पळवून नेणाऱ्या सहा जणांवर फौजदारी

जुने कवठेतील वाळू ठेका उद्ध्वस्त
कऱ्हाड : जुने कवठे-वडोली भिकेश्वर येथील अनधिकृत वाळू ठेका प्रांताधिकाऱ्यांनी छापा टाकून उद्ध्वस्त केला. येथील वाळू वाफे मुजवून झालेल्या उत्खननाच्या पंचनाम्याचे आदेश मंडलाधिकारी व तलाठ्यांना दिले. तसेच विनापरवाना व रात्रीच्या वेळी वाळू वाहतूक करणाऱ्या ३१ ट्रकांवर कारवाई करून १६ लाख ७४ हजारांच्या दंडाचा आदेश प्रांताधिकारी व तहसीलदारांनी दिला. या दोन्ही कारवाई शनिवारी रात्री व रविवारी करण्यात आल्या.
दरम्यान, कारवाई करून जप्त केलेले सहा ट्रक पळवून नेल्याप्रकरणी ट्रकमालक, चालकांवर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांचे वाहन परवाने रद्द करण्याचे आदेश प्रांताधिकऱ्यांनी दिले आहेत. वाळू ठेका उद्ध्वस्त केलेल्या ठेकेदाराचे नाव विनायक पिसाळ असे आहे.
ठेकेदार विनायक पिसाळ यांनी वाळू ठेक्याची पूर्ण रक्कम जमा न केल्याने त्यांना वाळू ठेक्याचा कब्जा देण्यात आलेला नव्हता. तरीही तेथे पिसाळ यांनी अनधिकृतपणे वाळूउपसा सुरू केल्याची माहिती प्रांताधिकारी किशोर पवार यांना मिळाली. या माहितीच्या आधारे प्रांताधिकारी किशोर पवार यांनी मंडलाधिकारी व तलाठी यांना बरोबर घेऊन रविवारी दुपारी अचानक जुने कवठे-वडोली भिकेश्वर येथे छापा टाकाला. यावेळी अनधिकृतपणे वाळूउपसा सुरू असल्याचे निदर्शनास आल्याने संबंधित वाळू ठेका उद्ध्वस्त करीत तेथील सर्व वाळू वाफे प्रांताधिकाऱ्यांच्या पथकाने तातडीने मुजविले.
याठिकाणी केलेल्या वाळू उत्खन्नाचे पंचनामे करण्याचे आदेश मंडलाधिकारी व तलाठ्यांना देण्यात आले आहेत. संबंधित ठेकेदारावर दंडनीय कारवाई बरोबरच फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. कऱ्हाड तालुक्यात विनापरवाना व रात्रीच्या वेळी वाळू वाहतूक सुरू असल्याने प्रांताधिकारी किशोर पवार यांच्या नेतृत्वाखाली मंडलाधिकारी व तलाठ्यांच्या संयुक्त पथकाने तालुक्यातील विविध ठिकाणी रात्रीच्या वेळी छापा टाकून ३१ ट्रकवर कारवाई केली. तहसील कार्यालयामध्ये कारवाई केलेले २१ ट्रक जमा करण्यात आले आहेत.
तर १० ट्रक उंब्रज पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात
आले आहेत. कारवाई करण्यात आलेल्या ३१ ट्रक मालकांवर प्रत्येकी ५४ हजारांप्रमाणे तहसीलदार राजेंद्र शेळके यांनी १६ लाख ७४
हजारांच्या दंडाचा आदेश दिला आहे. (प्रतिनिधी)
पेट्रोल पंपातून ट्रक पळवले
बेकायदा वाळू वाहतूकप्रकरणी एमएच ११ एएल 0१७, एमएच ४३ ई ६८१२, एमएच 0९ क्यू ६०१५, एमएच ११ एएल ६०९, एमएच ५०- ३१३१, एमएच ५०- ३६९६ हे सहा ट्रक महसूल विभागाने जप्त करून सैदापूर येथील सरस्वती पेट्रोल पंपामध्ये लावले होते. परंतु, संबंधित ट्रकमालक किंवा चालकांनी कारवाई केलेले ट्रक परवानगीशिवाय पळवून नेल्याने त्यांच्यावर फौजदारी गुन्हा व त्यांचा वाहन परवाना रद्द करण्यासाठी परिवहन अधिकाऱ्यांना प्रांताधिकाऱ्यांनी सूचना केल्या आहेत.