कऱ्हाडात ‘देशप्रेम’, ‘बंधूप्रेम’ भलतंच उफाळलं!

By Admin | Updated: August 20, 2016 00:25 IST2016-08-19T23:01:18+5:302016-08-20T00:25:40+5:30

कारण-राजकारण : स्वातंत्र्यदिनी जिलेबी तर रक्षाबंधनला चक्क मिठाईचे बॉक्स

'Deshpram' in Karhad, 'brother-in-law'! | कऱ्हाडात ‘देशप्रेम’, ‘बंधूप्रेम’ भलतंच उफाळलं!

कऱ्हाडात ‘देशप्रेम’, ‘बंधूप्रेम’ भलतंच उफाळलं!

प्रमोद सुकरे-- कऱ्हाड --कृष्णा-कोयनेच्या पवित्र प्रीतिसंगमावर वसलेल्या कऱ्हाडात सध्या ‘देशप्रेम’ व ‘बंधूप्रेम’ चांगलेच उफाळून आलेय. येऊ घातलेल्या पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे प्रेम व्यक्त होतंय, हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही. याबाबत शहरभर उलट-सुलट चर्चाही सुरू आहे. तोंडावर आलेला गणेशोत्सव व दुर्गोत्सवात हे प्रेम आणखी वाढल्यास आश्चर्य वाटायला नको.
काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या पालिका निवडणुकीचा ‘आखाडा’ डोळ्यासमोर ठेवून गत महिन्यात ‘आकाडी’नेही कहरच केला. ‘झिंग झिंग झिंगाट’ तरुणाईने शहराबाहेरील अनेक ढाबे व फार्म हाऊसवर सैराट होऊन मेजवानीवर ताव मारल्याचे बोलले जात आहे. मग ‘श्रावणमासी हर्षमानसी’ म्हणत आलेल्या महिन्याचे औचित्य साधत कन्यागत पर्वाचे नाव घेत काहींनी ‘जनजागृती’ सुरू केली. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या इतर इच्छुकांनी स्वातंत्र्यदिन व रक्षाबंधनाचा मुहूर्त साधत शहरवासीयांना आपलंसं करण्याचा प्रयत्न सुरू केलाय.
पालिकेची निवडणूक डिसेंबर महिन्यात होत आहे. प्रभाग रचना नव्याने जाहीर झाल्याने जात्यातले काहीजण सुपात तर सुपातले काहीजण जात्यात जाऊन पोहोचले आहेत. जात्यातल्यांनी मग हरकतींचा प्रपंच मांडला. मात्र, त्याचा काहीच परिणाम झालेला दिसत नाही. त्यामुळे गुडघ्याला बाशिंग बांधलेल्या इच्छुकांनी आता चाचपणीला सुरुवात केली आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या लढविल्या जात आहेत.
त्याचाच एक भाग म्हणून गेल्या महिन्यात आकाड्यांचे जणू पेवच फुटले. तरुण मतदारांची संख्या प्रत्येक प्रभागात जास्त आहे आणि तेच मतदान निर्णायक असल्याने त्यांच्यावर इच्छुकांनी जादा भिस्त ठेवल्याचे दिसते. त्यांना आग्रहाचं निमंत्रण देऊन जेवू-खाऊ घालून ‘अमृताचे डोस’ही पाजल्याची चर्चा आहे. ही सगळी सोय नजीकच्या ढाब्यावर तर काहींनी फार्म हाऊसवर केलेली होती.
यंदाच्या ७० व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत मग अनेकांचे राष्ट्रप्रेम भरभरूनच उफाळले. शहरवासीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देणारे फलक चौकाचौकांमध्ये झळकले. त्या शुभेच्छा नागरिकांपर्यंत पोहोचल्या; मात्र फ्लेक्स अद्यापही निघाल्याचे दिसत नाही. ठिकठिकाणी इच्छुकांनी जिलेबीचे स्टॉल लावत मतदारांचे तोंड गोड करण्याचा प्रयत्न केला.
गुरुवारी रक्षाबंधनाचा सण झाला. काही इच्छुकांचे बंधू‘प्रेम’ ‘सागरा’प्रमाणे जणू भरून आले. अन् ‘रेल्वे इंजिन’च्या गतीने प्रभागातील घराघरांमध्ये शुभेच्छा संदेश देत मिठाईचे बॉक्स पोहोचले.
त्यांचे हे बंधूप्रेम राजकीय असले तरी या उपक्रमाची चर्चा मात्र शहरभर झाली.
जिलेबी आणि मिठाईच्या माध्यमातून इच्छुकांनी मतदारांचे तोंड गोड करण्याचा प्रयत्न केलाय. या गोडीबरोबर त्यांच्या भावनाही नागरिकांपर्यंत पोहोचल्या खऱ्या; पण ‘रात गई, बात गई’ प्रमाणे ही गोडी लोकांच्या किती दिवस लक्षात राहणार, हे सांगता येत नाही. अन् हो... गणेशोत्सव आणि दुर्गोत्सव तोंडावर आलेत. त्यामुळे या देवदेवतांवरील प्रेमही यंदा कऱ्हाडात नक्कीच वाढलेले पाहायला मिळेल. मात्र, ते कोणाला पावणार, हे आत्तातरी सांगता येत नाही.

नगराध्यक्ष आरक्षणाकडे लक्ष
नगराध्यक्षांची निवड आता थेट जनतेतून होणार आहे. पूर्वी अडीच वर्षांचा कार्यकाल धरून हे आरक्षण मागासवर्गीय महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. मात्र, थेट जनतेतून आणि पाच वर्षांचा कार्यकाल असा बदल झाल्यानंतर मूळचे आरक्षण बदलणार की तेच राहणार, याबाबत संभ्रम आहे. त्यामुळे अनेकांच्या नजरा या आरक्षणाकडे लागल्या आहेत.


स्वार्थ आणि परमार्थ !
कऱ्हाडला राजकीय, सामाजिक, शैक्षणिक वारसा जसा आहे, तसा धार्मिक वारसाही मोठा आहे. येथे कृष्णा आणि कोयना या दोन नद्यांचा संगम पाहायला मिळतो. त्याला प्रीतिसंगम म्हटले जाते. या नदीकाठावर अनेक मंदिरे असून, आठ जुने घाटही आहेत. यंदा कन्यागत पर्वाचे औचित्य साधत एका राजकीय पक्षाने पुढाकार घेत येथे वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम घेण्याचा संकल्प सोडला आहे. त्यात त्यांचा ‘स्वार्थ’ आणि ‘परमार्थ’ दोन्ही दडलंय, हे न कळण्याइतपत नागरिक अडाणी नाहीत.

Web Title: 'Deshpram' in Karhad, 'brother-in-law'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.