देसाई-पाटणकर गटांत खडाजंगी
By Admin | Updated: March 4, 2016 00:59 IST2016-03-03T22:44:08+5:302016-03-04T00:59:07+5:30
पाटण पंचायत समिती : नरेंद्र पाटील यांच्या बैठकीत आमदार गटाच्या सदस्यांचा सभात्याग

देसाई-पाटणकर गटांत खडाजंगी
पाटण : विधानपरिषदेचे आमदार नरेंद्र पाटील यांनी गुरुवारी पाटण पंचायत समितीच्या सभागृहात बोलविलेल्या बैठकीत आमदार शंभूराज देसाई गटाच्या उपसभापती व इतर पंचायत समिती सदस्यांनी आम्हाला तालुक्याच्या पाणी टंचाई आढावा बैठकीला का बोलविले नाही? असा प्रश्न उपस्थित केल्यामुळे देसाई-पाटणकर गटात जोरदार खडाजंगी झाली.
दरम्यान, विधानपरिषदेच्या आमदारांना बैठक घेता येते असा जीआर आहे का? असा सवाल ही उपस्थित झाला. त्यावर आमदार पाटील व गटविकास अधिकारी एस. के. गौतम यांनी ही पाणी टंचाई बैठक केवळ अधिकाऱ्यांची असून, पदाधिकाऱ्यांना बोलविले नव्हते, असे सांगितले. तर जीआर बघावयाचा असेल तर मंत्रालयात जा असे आमदारांनी सुनावले. त्यावर समाधान न झाल्यामुळे आ. देसाई गटाच्या सदस्यांनी सभा सुरू होताच सभात्याग केला.
गुरुवारी आमदार नरेंद्र पाटील यांनी पाणी टंचाई आढावा बैठक सुरू करतानाच आमदार देसाई गटाचे उपसभापती व सदस्य हजर राहिल्याचे ओळखले. त्यांनी सुरुवातीलाच सांगितले की, मी आमदार आहे. आणि ढेबेवाडी माझे गाव आहे. मी तालुक्यातीलच असल्यामुळे मला अधिकाऱ्यांची बैठक बोलविण्याचा अधिकार आहे. त्यानंतर उपसभापती डी. आर. पाटील यांनी हस्तक्षेप करत गटविकास अधिकाऱ्यांनी या बैठकीबाबत आम्हाला का कळविले नाही. याबाबत लगेचच आमदारांनी सांगितले की, तुम्ही नंतर बैठक
घ्या आणि सभापती, ‘बीडीओ’ना विचारा या बैठकीत व्यत्यय आणू नका. अधिकाऱ्यांनी प्रथम मला सांगावे की, माजी आमदार पाटणकर यांनी आमदार असताना शेवटच्या १ वर्षात मंजूर केलेल्या कामांचे स्पष्टीकरण द्यावे. मी आता राष्ट्रवादीची बैठक लावलेली नाही. मी लोकप्रतिनिधी या नात्याने आढावा घेत आहे. त्यानंतर आ. देसाई गटाचे उपसभापती डी. आर. पाटील, सदस्य विजय पवार, नथूराम कुंभार, रघुनाथ माटेकर, सुमन जाधव आणि विजया देसाई हे बैठकीतून उठून गेले. त्यानंतर बैठकीत पाणीटंचाईचा आढावा झाला.
यावेळी सभापती संगीता गुरव, सत्यजित पाटणकर, विक्रमबाबा पाटणकर, राजाभाऊ शेलार, शोभा कदम, राजाभाऊ काळे, सुभाष पवार आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
अधिकाऱ्यांच्या घरात राहायला येऊ
तालुक्यातील पाणी टंचाईबाबत अधिकारी सुस्त असल्याचे जाणवत आहे. एकूण ७ गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागणार असूनही अद्याप टँकर सुरू नाहीत. अधिकाऱ्यांनी संपूर्ण पाणी टंचाई होईपर्यंत वाट बघू नये. येत्या दोन दिवसांत टँकर सुरू करा. अन्यथा अधिकाऱ्यांच्या घरी टंचाईग्रस्त लोक राहायला येतील. असा इशारा नरेंद्र पाटील यांनी बैठकीत दिला.
१०० गावे टंचाईच्या छायेत
येत्या मे अखेर तालुक्यातील १०० गावे पाणी टंचाईच्या टप्प्यात येणार असून, सध्या बौद्धवस्ती (डावरी) शिद्रु्रकवाडी, आंबेवाडी, घोट (फडतरवाडी), ज्योतिबाचीवाडी अशी ७ गावे टँकरच्या मागणीत आहेत.