देसाई-पाटणकर गटांत खडाजंगी
By Admin | Updated: June 13, 2015 00:26 IST2015-06-12T22:29:25+5:302015-06-13T00:26:02+5:30
पाटण पंचायत समिती सभा : बैठकीची वेळ बदलल्याचे झाले निमित्त; प्रोसिडिंगवरूनही गदारोळ

देसाई-पाटणकर गटांत खडाजंगी
पाटण : पंचायत समितीची मासिक सभा सकाळी अकरा वाजता असल्याचे नोटीस सर्व सदस्यांना पाठविले. त्यानुसार उपसभापतींसह देसाई गटाचे सर्व सदस्य हजर होते. तर पाटणकर गटाचे सर्व सदस्य सभापतींसह दुपारी सव्वा एक वाजता बैठकीस आले. त्यामुळे ताटकळत बसलेल्या देसाई गटाच्या सदस्यांचा चांगलाच पारा चढला होता. मात्र, बैठकीच्या दोन दिवस अगोदर दुपारी १ वाजता सभा असल्याची दुरुस्ती करण्यात आल्याचे सभापतींनी सांगितले. या विषयावरून देसाई-पाटणकर गटांतील सदस्यांमध्ये चांगलाच गदारोळ झाला. दरम्यान, चाफळ येथे झालेल्या बैठकीकडे चर्चेनुसार प्रोसिडिंग लिहिले नसल्याच्या कारणावरूनही बराचकाळ खडाजंगी उडाली.
पाटणकर गटाच्या सदस्यांच्या खुर्च्या रिकाम्या होत्या. सभापती संगीता गुरव देखील आल्या नव्हत्या. त्यातच सकाळी अकरा वाजताची मीटिंग असल्याचे समजून देसाई गटाचे सर्व सदस्य बराचवेळ ताटकळत बसले होते. त्यामुळे उपसभापतींनी गटविकास अधिकारी अरविंद पाटील यांना धारेवर धरत एक वाजून दहा मिनिटे झाली तरी पाटणकर गटाचे सदस्य आलेले नाहीत. ‘सभापतींना वेळ पाळता येत नसेल तर हे तालुक्याचे दुर्दैव्य आहे. तुम्ही मीटिंग चालू करा; अन्यथा आमच्या प्रोसिडिंगरवर सह्या घ्या, आम्ही निघून जातो,’ असा पवित्रा घेतला. सदस्य विजय पवार देखील चांगलेच संतापले. त्यानंतर सभापतींसह सर्व सदस्य सभागृहात आले. आणि पुन्हा खडाजंगी सुरू झाली.
त्यावर राजाभाऊ शेलार व राजेश पवार यांनी पुन्हा असे होणार नाही, उपसभापतींना विश्वासात घेतले जाईल, असे आश्वासन मिळाल्यानंतर सभेतील वादावर पडदा पडला.
‘पाटण तालुक्यातील प्राथमिक शाळांना आय. एस. ओ. मानांकन दर्जा मिळाला पाहिजे,’ असे लाहोटी म्हणाले. आरोग्य विभागाने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर २६ पथके कार्यरत केली असून, सर्पदंश आणि श्वानदंशाच्या लसी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपलब्ध ठेवल्याचे सांगण्यात आले. तर केरळ व मुरूड आरोग्य केंद्रात एक डॉक्टर कार्यरत असल्याचा मुद्दाही चर्चेला गेला. (प्रतिनिधी)
जरा याद करो कुर्बानी...
मासिक सभेत दरवेळी श्रद्धांजली व अभिनंदन करण्याचा प्रस्ताव मांडला जातो. मात्र, या मासिक सभेत असा कोणताच ठराव मांडण्यात आला नाही. मनीपूर येथे दहशतवादी हल्ल्यात अठरा जवान शहीद झाले होते. त्या जवानांची आठवण झाली नाही.