वंचित आघाडीचे धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 05:03 IST2021-05-05T05:03:23+5:302021-05-05T05:03:23+5:30
सातारा : कोविड-१९ चे संक्रमण सातारा जिल्ह्यामध्ये सतत वाढताना दिसत असतानाच सर्व पेशंटना आवश्यक औषधोपचार व आरोग्य सुविधा वेळेत ...

वंचित आघाडीचे धरणे आंदोलन
सातारा : कोविड-१९ चे संक्रमण सातारा जिल्ह्यामध्ये सतत वाढताना दिसत असतानाच सर्व पेशंटना आवश्यक औषधोपचार व आरोग्य सुविधा वेळेत व मोफत मिळाव्यात व बेड व ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेडविना मृत्यूचे तांडव थांबून तशी व्यवस्था उभारावी, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.
जिल्ह्यातही कोविड-१९ ने संक्रमणाचा मोठा उच्छाद मांडला आहे, याला रोखण्यासाठी लॉकडाऊन हा जसा उपाय आहे, तसाच संक्रमित झालेला पेशंट औषधोपचारासाठी वणवण फिरता कामा नये, त्याला जागेवरच उपचार मिळावेत तसेच त्याला आवश्यकतेप्रमाणे बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, इंजेक्शन एकाच ठिकाणी व्यवस्था करावी तसेच काेरोना पॉझिटिव्ह आलेले रुग्ण घरात नव्हे तर विलगीकरण कक्षात ठेवले तर आणि तरच संक्रमण थोपवू शकतो, याचा विचार व्हावा.
पालकमंत्री, गृहराज्यमंत्री, सभापती आणि जिल्हा प्रशासन काय कामाचे, असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे. माहिती कक्ष चालू केला आहे. त्यांच्याकडे नोंद करूनही तीनचार दिवस झाले, तरी बेड मिळत नाही, अशी परिस्थिती असून ती तत्काळ सुधारावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खंडाईत यांनी यावेळी केली.
फोटो : सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सोमवारी धरणे आंदोलन करण्यात आले. (छाया : जावेद खान)