वंचित बहुजन आघाडी किसान बाग धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:08 IST2021-02-05T09:08:22+5:302021-02-05T09:08:22+5:30
सातारा : वंचित बहुजन आघाडीच्यावतीने किसान बाग धरणे आंदोलन करण्यात आल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष फारुख ...

वंचित बहुजन आघाडी किसान बाग धरणे आंदोलन
सातारा : वंचित बहुजन आघाडीच्यावतीने किसान बाग धरणे आंदोलन करण्यात आल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष फारुख पटणी यांनी दिली.
पंजाब, हरियाणा राज्यातील शेतकरी गेले दोन महिने न्याय्य हक्कांसाठी लढत असताना त्यांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी मुस्लीम समुदायाच्या जनतेने शेतकरी आंदोलनास पाठिंबा दर्शवून एकतेचा सूर आळवला पाहिजे. ॲड. बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांनी ही भूमिका घेतली असल्याने त्याच अनुषंगाने सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर किसान बाग धरणे आंदोलन करण्यात आल्याचे जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत यांनी पत्रकात म्हटले आहे.
किसान बाग धरणे आंदोलनात दिल्ली येथील किसान आंदोलनामध्ये शहीद झालेल्या आंदोलकांना आदरांजली वाहण्यात आली. त्यावेळी शहीद आंदोलनकारी कार्यकर्त्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ नये, यासाठी केंद्र सरकारने शेतकरीविरोधी काळे कायदे रद्द करून शेतकरीवर्गाचे आंदोलन थांबवावे, अन्यथा सर्व मुस्लीम व वंचित समूह यांना एकत्र करून किसान आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी आम्हालाही दिल्लीत जाऊन तीव्र आंदोलन करावे लागेल, याची सर्व जबाबदारी शासनाची राहील, असाही इशारा या किसान बाग धरणे आंदोलनाच्या माध्यमातून केंद्र सरकारला देण्यात आला.
यावेळी या किसान बाग धरणे आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खंडाईत, जिल्हा उपाध्यक्ष फारूख पटनी, बाळकृष्ण देसाई, गणेश कारंडे, जिल्हा सरचिटणीस दादासाहेब केंगार, मुस्लीम सेवा संघाचे नेते शकीलभाई शेख, जमाते उलेमा हिंदेचे मौलाना जमीरभाई मुल्ला, रफीक शेख, महिला आघाडीच्या आयेशा पटनी, द्राक्षाताई खंडकर, कल्पना कांबळे, जिल्हा सचिव सुधाकर काकडे, जिल्हा संघटक गणेश भिसे, प्रा डी. बी. जाधव, सत्यवान कांबळे, शशिकांत खरात, डी. डी. धडचिरे, अविनाश गायकाड आदी सातारा जिल्ह्यातील सर्व मुस्लीम समुदायांच्या विविध सामाजिक संस्था, संघटना यांनी तसेच वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
फोटो ओळ : सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीतर्फे धरणे आंदोलन करण्यात आले.