‘पर्ल्स’विरोधात ठेवीदार एकवटले
By Admin | Updated: December 2, 2014 00:18 IST2014-12-01T23:01:49+5:302014-12-02T00:18:52+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा : ‘एमपीआयडी’ची केली मागणी

‘पर्ल्स’विरोधात ठेवीदार एकवटले
सातारा : ठेवीदारांच्या रकमा वेळेवर परत मिळत नसल्यामुळे ‘पीएसीएल’ तथा ‘पर्ल्स’ कंपनीवर ‘एमपीआयडी अॅक्ट १९९९’ अंतर्गत कारवाई करावी, या मागणीसाठी जिल्ह्यातील तीनशेहून अधिक ठेवीदारांनी सोमवारी अण्णा हजारे भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन न्यासच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.
अण्णा हजारे भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन न्यासचे जिल्हाध्यक्ष संदीप जगताप, ठेवीदार प्रतिनिधी चंद्रकांत घाडगे, तात्या ऊर्फ उत्तम सावंत आणि तीनशेहून ठेवीदारांनी सोमवारी सकाळी हुतात्मा स्मारकास अभिवादन केले आणि मोर्चाला सुरुवात केली. यावेळी ठेवीदारांनी आपल्या हातात फलक घेतले होते. फलकावर पर्ल्सचा निषेध करणारा मजूकर होता. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आल्यानंतर त्याचे सभेत रूपांतर झाले.
जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पर्ल्स कपंनीत रक्कम गुंतवलेल्या ठेवीदारांना मुदत संपल्यानंतरही रक्कम परत मिळालेली नाही. या कंपनीत सातारा जिल्ह्यातील सात हजारांहून अधिक ठेवीदारांचे जवळपास सातशे ते आठशे कोटी अडकून पडले आहेत. महाराष्ट्रातील लाखो ठेवीदारांचे जवळपास आठ हजार कोटी अडकून पडले आहेत. ‘पर्ल्स कंपनीवर महाराष्ट्र प्रोटेक्शन आॅफ इंटरेस्ट आॅफ डिपॉझिटर्स (इन फायनान्सिएल इस्टॅब्लिशमेंट) अॅक्ट १९९९’ नुसार कारवाई करावी. ‘एमपीआयडी अॅक्ट’च्या कलम ४ चे ३ तरतुदीनुसार जिल्हाधिकारी प्राधिकृत अधिकारी असून, त्यांनी प्रत्यक्ष गुंतवणूकदारांच्या तक्रारी ऐकून कारवाई करता येत असल्यामुळे पुढील कारवाईसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याची तरतूद आहे. असे झाले तर शासन कॉम्पिन्ट अॅथॉरिटी नेमून कंपनी आणि संचालकांच्या आणि त्याच्या नातेवाइकांच्या स्थावर, जंगम मालमत्ता जप्त करू शकणार आहे. परिणामी गुंतवणूकदारांच्या रकमा सुरक्षित होणार आहेत. यामुळे ठेवीदारांना मोठा आधार मिळणार आहे. (प्रतिनिधी)
सोमवारपासून उपोषण
पर्ल्स कंपनीने ठेवीदारांची रक्कम परत करत नसेल तर ठेवीदार ‘एमपीआयडी अॅक्ट’ अंतर्गत कारवाई करण्याच्या मागणीवर ठाम आहेत. ही कारवाई नाही झाली तर सोमवार, दि. ८ पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठेवीदार उपोषणास बसणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
एजंटांनी घेतला कानोसा...
‘पर्ल्स’विरोधात मोर्चा निघू नये म्हणून काही एजंट प्रयत्न करत असल्याची माहिती मोर्चात सहभागी झालेल्या ठेवीदारांनी दिली. विशेष म्हणजे, या मोर्चामध्ये तक्रारदारच सहभागी होणार असल्यामुळे ते कोण आहेत, याची माहिती एजंटांनी मिळविल्यामुळे ते ठेवीदारांशी संपर्क साधून मोर्चात सहभागी होऊ नका म्हणून विनंती करत असल्याची माहिती एका ठेवीदाराने यावेळी दिली.
काही एजंट येथे कानोसा घेत असल्याचे ‘अण्णा हजारे भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन न्यास’च्या वतीने सांगण्यात आले. दरम्यान, एजंट कानोसा घेत असल्याची माहिती ठेवीदारांना मिळाल्याचे कळताच एजंटांनी येथून काढता
पाय घेतला.