कृषी विभागाने रानभाज्यांचे महत्त्व सांगावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:44 IST2021-08-14T04:44:14+5:302021-08-14T04:44:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्यात कृषी विभागामार्फत रानभाज्या महोत्सव भरविण्यास सुरुवात केली आहे. या महोत्सवाच्या ...

कृषी विभागाने रानभाज्यांचे महत्त्व सांगावे
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्यात कृषी विभागामार्फत रानभाज्या महोत्सव भरविण्यास सुरुवात केली आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून रानभाज्या आरोग्यासासाठी किती लाभदायक आहेत याचा नागरिकांमध्ये प्रचार व प्रसार करावा, असे आवाहन पालकमंत्री बाळसाहेब पाटील यांनी केले.
येथे कृषी विभागामार्फत रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री बाळसाहेब पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या महोत्सवास आमदार दीपक चव्हाण, आमदार महेश शिंदे, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गुरुदत्त काळे आदी उपस्थित होते.
कोरोना संसर्गामुळे कडक निर्बंध लावण्यात आले. या निर्बंधांमध्ये शेतकऱ्यांना सूट देण्यात आली होती. ग्राहकांना लागणारा माल पिकवून लॉकडाऊनच्या काळात ग्राहकांची चांगल्या पद्धतीने सोय केली. तरुण पिढी विविध तंत्रज्ञानाचा भर देत चांगल्या पद्धतीने शेती करीत आहे. तरुण शेतकऱ्यांना कृषी विभागाने वेळोवेळी मार्गदर्शन करून त्यांना मदत करावी. आज सेंद्रिय शेतीला फार महत्त्व आले आहे. सेंद्रिय मालाला बाजारपेठेत चांगला भावही मिळत आहे. तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती करण्यावर भर द्यावा, असे आवाहनही पालकमंत्री पाटील यांनी केले.
कार्यक्रमात विविध पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचा सत्कार पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते करून रानभाज्यांचे महत्त्व सांगणाऱ्या पुस्तिकेचेही विमोचन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी उपसंचालक विजयकुमार राऊत यांनी केले. या कार्यक्रमास शेतकरी उपस्थित होते.
फोटो ओळ : सातारा येथे आयोजित केलेल्या रानभाज्या महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी शेतकऱ्यांकडून रानभाज्यांची माहिती घेतली.