लक्ष्मी टेकडीत आढळल्या डेंग्यूच्या अळ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:16 IST2021-02-05T09:16:33+5:302021-02-05T09:16:33+5:30
सातारा : लक्ष्मी टेकडी परिसरात हिवताप विभागाने केलेल्या सर्व्हेत १९ घरांत व ३४ कंटेनरमध्ये डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्याने खळबळ ...

लक्ष्मी टेकडीत आढळल्या डेंग्यूच्या अळ्या
सातारा : लक्ष्मी टेकडी परिसरात हिवताप विभागाने केलेल्या सर्व्हेत १९ घरांत व ३४ कंटेनरमध्ये डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ‘हाऊस इंडेक्स’ने डासांच्या अळ्यांचे प्रमाण २७.१ इतके दर्शविले असून, ही नागरिकांसाठी धोक्याची घंटा आहे.
सातारा शहर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून डेंग्यू व मलेरियासदृश रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. पालिका प्रशासन व हिवताप विभागाकडून जनजागृती करूनही नागरिक घर व परिसर स्वच्छ ठेवत नसल्याने डेंग्यूच्या अळ्यांची उत्पत्ती वाढू लागली आहे. काही दिवसांपूर्वी करंजे येथे डेंग्यूचे रुग्ण आढळून आले होते. आता सर्वाधिक दाट लोकवस्ती असलेल्या व लक्ष्मी टेकडी परिसरात डेंग्यू, चिकनगुनियाचे रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
जिल्हा हिवताप विभागाच्या पथकाने लक्ष्मीटेकडी परिसरात गेल्या दोन दिवसांपासून सर्व्हेचे काम हाती घेतले आहे. या सर्व्हेत ७० पैकी १९ घरांत, तर १४७ पैकी ३४ कंटेनरमध्ये डेंग्यू व चिकनगुनियाच्या अळ्या आढळून आल्याने चिंतेत वाढ झाली आहे. ‘हाऊस इंडेक्स’नुसार हे प्रमाण १० पेक्षा कमी असणे गरजेचे आहे. मात्र, लक्ष्मीटेकडी येथील अळ्यांचे प्रमाण २७.१ असल्याने ही धोक्याची घंटा आहे. पालिकेने नागरिकांची आरोग्य तपासणी करून या परिसरात निर्जंतुकीकरण व स्वच्छता मोहीम प्रभावीपणे राबविणे गरजेचे आहे.
(पॉइंटर)
घरांची तपासणी - ७०
अळ्या सापडलेली घरे - १९
तपासलेले कंटेनर - १४७
अळ्या सापडलेले कंटेनर - ३४
हाऊस इंडेक्स - जोखमीचा निर्देशांक १०
- सध्याचा निर्देशांक २७.१
कंटेनर इंडेक्स - जोखमीचा निर्देशांक १०
- सध्याचा निर्देशांक १५.२
(चौकट)
हाऊस इंंडेक्स म्हणजे काय?
डास अळ्यांचे प्रमाण ‘हाऊस इंडेक्स’नुसार मोजले जाते. यासाठी हिवताप विभागाकडून घरांचा व पाण्याने भरलेल्या कंटेनरचा सर्व्हे केला जातो. तपासलेली एकूण घरे व एकूण कंटेनरचा भागाकार करून हाऊस इंडेक्स काढला जातो. निर्देशांक १० व त्यापेक्षा कमी असल्यास धोका कमी संभवतो. मात्र निर्देशांक १० हून अधिक असल्यास धोक्याचे प्रमाण वाढते.
(कोट)
लक्ष्मी टेकडी परिसरात डासांच्या अळ्या मोठ्या प्रमाणात आढळून आल्या आहेत. हिवताप विभागाने अळ्या नष्ट करण्याची मोहीम हाती घेतली आहे. तरीही नागरिकांनी घर व परिसराची स्वच्छता राखावी. साठवलेले पाणी व्यवस्थित झाकून ठेवावे. घरांच्या सभोवताली टाकाऊ वस्तू ठेवू नयेत.
- अश्विनी जंगम, जिल्हा हिवताप अधिकारी
फोटो : ०३ लक्ष्मी टेकडी सर्व्हे
जिल्हा हिवताप विभागाच्या कर्मचाऱ्यांनी लक्ष्मी टेकडी येथील घरे व पाण्याने भरलेल्या कंटेनरची तपासणी करून डासाच्या अळ्यांचा शोध घेतला.