४०० पैकी ४४ घरांत डेंग्यूच्या अळ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:43 IST2021-08-28T04:43:31+5:302021-08-28T04:43:31+5:30
सातारा : डेंग्यू प्रतिबंधासाठी हिवताप विभागाकडून नेमण्यात आलेल्या १३ पथकांकडून शहरात सर्व्हेचे काम करण्यात आले आहे. दोन दिवसांत या ...

४०० पैकी ४४ घरांत डेंग्यूच्या अळ्या
सातारा : डेंग्यू प्रतिबंधासाठी हिवताप विभागाकडून नेमण्यात आलेल्या १३ पथकांकडून शहरात सर्व्हेचे काम करण्यात आले आहे. दोन दिवसांत या पथकाने शहरातील ४०० घरे व एक हजार ७४५ नागरिकांचा सर्व्हे केला. या पैकी ४४ ठिकाणी डेंग्यू अळ्या आढळून आल्या असून, त्या तातडीने नष्ट करण्यात आल्या.
सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनासह डेंग्यू व चिकुुनगुनियाचे रुग्ण सातत्याने आढळून येत आहेत. कऱ्हाड व सातारा तालुक्यांत अशा रुग्णांनी संंख्या सर्वाधिक असून, हिवताप विभागाने डेंग्यू प्रतिबंधासाठी ठोस पावले उचलली आहेत. शहर व उपनगरास सर्व्हे करून डेंग्यू अळ्या नष्ट करण्यासाठी आशासेविकांच्या १३ पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. या पथकाला सर्व्हे कसा करावा, डेंग्यू अळ्यांचा शोध घेऊन त्या कशा नष्ट कराव्या, याचे प्रशिक्षण देण्यात आले. यानंतर, गुरुवारपासून प्रत्यक्ष सर्व्हे सुरू करण्यात आला.
दोन दिवसांत या पथकाने शहरातील तब्बल ४०० घरांना भेटी दिल्या. ताप, अंगदुखी, सांधेदुुखी, डोळ्यांभोवती जळजळ, अशक्तपणा अशी लक्षणे आढळून आलेल्या नागरिकांच्या नोंदी पथकाकडून घेण्यात आल्या, तसेच घरातील पाण्याचे पिंप, टाक्या, फ्रीज, एसी, भंगार साहित्य आदींची तपासणीही केली. यावेळी ४४ ठिकाणी डेंग्यू अळ्या आढळून आल्या. या अळ्या तातडीने नष्ट करण्यात आल्या.
(कोट)
हिवताप विभागाने सातारा शहरात सर्व्हेचे काम हाती घेतले आहे. डेंग्यू आटोक्यात आणण्यासाठी हा सर्व्हे निश्चितच महत्त्वाचा ठरेल. डेंग्यू अळ्या नष्ट करण्याबरोबरच नागरिकांमध्ये आरोग्याबाबत जनजागृतीही केली जात आहे. नागरिकांनीही घर व परिसर स्वच्छ ठेवून आठवडण्यातून एक दिवस कोरडा पाळावा.
- अश्विनी जंगम, जिल्हा हिवताप अधिकारी
(चौकट)
४०० घरांना भेटी
१७४५ नागरिकांच्या नोंदी
८०९ पाण्याचे पिंप तपासले
४४ पिंपात आढळल्या अळ्या
३३ पिंप रिकामे करण्यात आले
११ पिंपात जंतुनाशक टाकण्यात आले
फोटो : २७ हिवताप विभाग सर्व्हे
हिवताप विभागाचे कर्मचारी व आशासेविकांकडून सातारा शहरात सर्व्हे सुरू करण्यात आला आहे. घरांना भेटी देऊन डेंग्यू अळ्या नष्ट करण्याचे काम या पथकाकडून केले जात आहे.