बामणोली तर्फ कुडाळ येथील कोनशिलेची तोडफोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:08 IST2021-02-05T09:08:53+5:302021-02-05T09:08:53+5:30
कुडाळ : जावळी तालुक्यातील बामणोली तर्फ कुडाळ याठिकाणी हुतात्मा सर्जेराव जाधव यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्मारक बांधण्यात आलेले आहे. काही महिन्यांपूर्वी ...

बामणोली तर्फ कुडाळ येथील कोनशिलेची तोडफोड
कुडाळ : जावळी तालुक्यातील बामणोली तर्फ कुडाळ याठिकाणी हुतात्मा सर्जेराव जाधव यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्मारक बांधण्यात आलेले आहे. काही महिन्यांपूर्वी या स्मारकाचे नूतनीकरण झाले असून, या ठिकाणच्या कोनशीलेची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.
या स्मारकासाठी दिवंगत भानुदास तरडे यांनी दोन एकर सोळा गुंठे जमीन दिली होती. त्यांची कोनशीला या ठिकाणी असून, ती अज्ञातांकडून फोडण्यात आली आहे. तसेच याठिकाणी संरक्षक भिंतीचे झालेले काम निकृष्ट दर्जाचे आहे. याकडे संबंधित विभाग दुर्लक्ष करत आहे. या हुतात्मा स्मारकाची देखभालीसाठी शासनाने ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
१९२६ ते ४७ या काळात देशासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्मा सर्जेराव जाधव यांच्या बलिदानाचे प्रतीक म्हणून या हुतात्मा स्मारकाची निर्मिती करण्यात आली होती. याकरिता तरडे कुटुंबीयांकडून दोन एकर सोळा गुंठे जमीन दिली होती. नुकतेच या ठिकाणी १६ लाख रुपये खर्च करून नूतनीकरण करण्यात आले आहे. मात्र, बांधकाम विभाग आणि महसूल विभागाच्या गलथान कारभारामुळे याठिकाणचा निकृष्ट कामाचा नमुना समोर आला आहे. येथे बांधण्यात आलेली संरक्षकभिंत खालून निकामी झाल्याचे दिसत आहे. हुतात्मा स्मारकामध्ये बसवण्यात आलेल्या फरशीचे सिमेंटही निघाले आहे. यामुळे या कामाबाबत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
(कोट)
हुतात्मा स्मारकासाठी भानुदास तरडे यांनी मोफत जागा दिली असून आज याठिकाणी त्यांच्याच कोनशिलेची झालेली तोडफोड पाहावत नाही. या जागेत उभारलेल्या हुतात्मा स्मारकाचीही दुरवस्था झालेली आहे. शासनाने याची योग्य दखल घेत तत्काळ याठिकाणच्या कामाची चौकशी करावी तसेच स्मारकाची जागावगळता आमची उर्वरित जागा आम्हाला परत करावी किंवा करारावर वहिवाटीसाठी मिळावी. याबाबत प्रशासनाशी वारंवार पत्रव्यवहार केलेला आहे.
-चंद्रकांत तरडे-इनामदार, बामणोली तर्फ कुडाळ
२७कुडाळ स्मारक
फोटो : बामणोली तर्फ कुडाळ येथील हुतात्मा स्मारकासाठी मोफत जागा देणाऱ्या दिवंगत भानुदास तरडे यांच्या कोनशिलेची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली आहे.