लोकशाही नव्हे संधीसाधूंची आघाडी !
By Admin | Updated: December 24, 2015 23:56 IST2015-12-24T23:11:10+5:302015-12-24T23:56:44+5:30
विरोधी नगरसेवक आक्रमक : कऱ्हाडात रस्तेखोदकामावरून आंदोलन

लोकशाही नव्हे संधीसाधूंची आघाडी !
कऱ्हाड : ‘शहरात गेल्या पाच वर्षांपासून एकही काम निट न करणारी सत्ताधारी पक्षाची आघाडी ही लोकशाही नसून संधीसाधू, फसवणूक करणाऱ्या नगरसेवकांची आघाडी आहे. गेल्या पाच वर्षांत बहुमताच्या जोरावर जनतेची फसवणूक करणे, शासकीय मालमत्तेचे नुकसान करणे, स्वत:चे कार्यकर्ते पोसण्याकरिता ठेकेदारांना भरघोस सवलत देणे व स्वत:चा आर्थिक फायदा करून घेणे एवढाच लोकशाही आघाडीने उद्योग केला आहे.’ अशी टीका नगरसेवक श्रीकांत मुळे यांनी केली.
वायफाय योजनेसाठी शहरात खोदण्यात आलेले रस्ते त्यांची झालेली दुरवस्था व त्यामुळे नागरिकांना होत असलेल्या त्रास याबाबत गुरुवारी कऱ्हाड पालिकेच्या विरोधी आघाडीतील नगरसेवकांनी आक्रमक पवित्रा घेतला. यावेळी नगरसेवकांनी गुरुवार पेठ येथील सराफ कट्टा या ठिकाणी आंदोलन केले. यावेळी ते बोलत होते. शारदाताई जाधव, अरुणा शिंदे, श्रीकांत मुळे, बाळासाहेब यादव, विक्रम पावसकर, सुरेखा पालकर, विनायक पावसकर आदी उपस्थित होते. या कामांची चौकशी करावी, अशी मागणी करत मुख्याधिकारी प्रशांत रोडे यांना सर्व नगरसेवकांनी निवेदन दिले.
नगरसेवक मुळे म्हणाले, ‘वायफाय या सुविधेसाठी शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आले आहे. त्यामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. सत्ताधारी नगरसेवक व कंपनीचे ठेकेदार यांचे हितसंबंध असल्याने स्वत:चा आर्थिक फायदा करून घेण्याकरिता जनतेला वेठीस धरण्याचे काम सत्ताधारी पक्षाने केले आहे. वायफाय सुविधेतून लोकांना मोफत इंटरनेट वापरता येणार असल्याचे सांगत सुविधा उभारण्यात येत आहे. यातून निव्वळ जनेतची फसवणूक केली जात आहे. अद्यापही ही सुविधा का सुरू होऊ शकली नाही ? या सुविधेबाबत अजूनपर्यंत संपूर्ण माहिती का दिली जात नाही?’
रस्ता चुकीच्या बाजूने खोदत आहेत, हे कामगारांच्या लक्षात आल्यानंतर तो त्याच अवस्थेत गेले २० दिवस ठेवून दुसऱ्या बाजूने नव्याने खोदकाम सुरू केले. या चुकीमुळे आर्थिक नुकसान ठेकेदारांकडून झाले आहे, असेही विरोधी आघाडीच्या नगरसेवकांनी सांगितले. (प्रतिनिधी)
नगरसेवक की कंपनीचे एजंट !
लोकशाही आघाडीतील नगरसेवकांच्या बेजबाबदार वृत्तीचा पुरावा म्हणजे हे आज शहरात चालत असलेले चुकीचे, बेकायदेशीरपणे काम होय. या कामांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत कंपनीच्या ठेकेदारांच्या व्यवसायाला लावलेला याचा हातभार यावरून लोकशाही आघाडीचे नगरसेवक हे खरे तर नगरसेवक आहेत की कंपनीचे एजंट ? असा सवाल करण्यात आला.