वाई-सोळशी-वाठार बस सुरू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:40 IST2021-02-09T04:40:57+5:302021-02-09T04:40:57+5:30
पिंपोडे बुद्रुक : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेली वाई-सोळशी-वाठार स्टेशन बससेवा पूर्ववत सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांच्यावतीने निवेदनाद्वारे ...

वाई-सोळशी-वाठार बस सुरू करण्याची मागणी
पिंपोडे बुद्रुक : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेली वाई-सोळशी-वाठार स्टेशन बससेवा पूर्ववत सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांच्यावतीने निवेदनाद्वारे जीवन सोळस्कर यांनी केली आहे.
उत्तर कोरेगाव तालुक्यातील सोळशी भागात लालपरी बंद असल्याने भागातील जनतेची गैरसोय होत आहे. दररोज सातारा-वाई आणि इतर शहरी भागात वैद्यकीय, बाजारहाट, शाळा, कॉलेज व इतर कारणांसाठी नागरिकांना तसेच विद्यार्थ्यांना ये-जा करावी लागते. कोरोनामुळे गेली कित्येक दिवस सोळशी भागातील लालपरी अर्थात एसटी बससेवा बंद आहे. या भागातील मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना वाई, सातारा आणि इतर शहरी ठिकाणी शाळा, कॉलेजसाठी जावे लागते आणि ही एसटी बससेवा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. मात्र, आता कोरोना जवळपास संपून परिस्थिती पूर्वपदावर आल्यामुळे सोळशी मार्गे वाई वाठार बस चालू करण्याची मागणी उत्तर कोरेगाव तालुक्यातील सोळशी, नायगाव, नांदवळ, सोनके, करंजखोप गावांतील नागरिकांमधून होत आहे. त्यामुळे सोळशी, नायगाव, करंजखोप या ग्रामपंचायतींच्या पत्राद्वारे राज्य परिवहन महामंडळाच्या वाई येथील विभागीय नियंत्रकांना निवेदन देण्यात आले आणि लवकर सोळशी मार्गे वाई-वाठार एसटी बसच्या फेऱ्यांचे नियोजन करावे, अशी मागणी करण्यात आली. यावेळी जीवन सोळस्कर, दयाराम सोळस्कर, धनंजय धुमाळ, बाळासाहेब यादव, संतोष देशमुख आदी उपस्थित होते.