रिक्षाची भाडेवाढ कमी करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:40 IST2021-04-04T04:40:32+5:302021-04-04T04:40:32+5:30
कऱ्हाड : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर दळणवळण सुरळीत झाले. सोशल डिस्टन्सिंगमुळे खासगी प्रवासी वाहनांमध्ये ठरावीकच प्रवासी बसविले जात होते. ...

रिक्षाची भाडेवाढ कमी करण्याची मागणी
कऱ्हाड : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर दळणवळण सुरळीत झाले. सोशल डिस्टन्सिंगमुळे खासगी प्रवासी वाहनांमध्ये ठरावीकच प्रवासी बसविले जात होते. भाडे दुप्पट आकारले जात होते. आता क्षमतेपेक्षा जादा प्रवासी भरूनही भाडे कमी केले गेलेले नाही. ही भाडेवाढ कमी करावी, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. बनवडी, विद्यानगर मार्गावर दुप्पट भाडेवाढ करण्यात आली होती. ती अद्याप कायम असून, पूर्वीप्रमाणे दहा रुपये करावी, अशी मागणी होत आहे. गत अनेक दिवसांपासून वीस रुपये भाडे आकारले जात आहे. त्यामुळे प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
ढेबेवाडी विभागात कूपनलिका बंद
ढेबेवाडी : विभागातील अनेक गावांमध्ये सध्या कूपनलिका बंद स्थितीत आहेत. वेळेत दुरुस्ती न केल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली असून, ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. गावोगावी विविध योजनांमधून कूपनलिका खोदण्यात आल्या. सार्वजनिक वापरामुळे काहीजणांनी त्याचा कसाही वापर केला. परिणामी, अनेक ठिकाणी कूपनलिकांची दुरवस्था झाली. त्याची वेळेत दुरुस्ती न केल्यामुळे सध्या बिकट परिस्थिती निर्माण झाली असून, कूपनलिका दुरुस्त करण्याची मागणी ग्रामस्थांतून केली जात आहे.
कऱ्हाडात मठासमोर अस्ताव्यस्त पार्किंग
कऱ्हाड : शहरातील विठ्ठल चौकातील मारुतीबुवा कऱ्हाडकर मठाभोवती नागरिकांकडून वाहनांचे अस्ताव्यस्त पार्किंग केले जात आहे. त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या भाविक व नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. कऱ्हाडकर मठाच्या परिसरात मोकळी जागा आहे. या जागेत अनेकजण बिनधास्तपणे वाहन पार्क करतात. मात्र, वाहने पार्क करताना इतरांचा विचार केला जात नाही. असे बेशिस्त वाहन पार्क करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
लोंबकळणाऱ्या विद्युत तारांचा धोका
कऱ्हाड : कऱ्हाड शहरातील नागरिक व पक्ष्यांच्या जिवास सध्या धोका निर्माण झाला आहे. कारण शहरात मुख्य रस्त्यांसह अंतर्गत भागातील रस्त्यांवर, तसेच त्याकडेला असलेल्या घरांवरील विद्युत तारा खाली आलेल्या आहेत. या तारांतील विद्युत प्रवाहामुळे वटवाघळेही मृत्युमुखी पडली आहेत. सुसाट वाऱ्यामुळे उंच वृक्षांच्या फांद्याही या तारांवर पडत आहेत. त्यामुळे वीज वाहिन्या तुटण्याच्या घटना घडत आहेत. मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
स्वच्छतेसाठी घरोघरी जनजागृती सुरू
कऱ्हाड : कऱ्हाड शहराला स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी पालिकेच्या आरोग्य विभागातील महिलांसह स्वच्छ सर्वेक्षण उपक्रमातील स्वच्छतादूत यांच्याकडून घरोघरी जाऊन महिलांना स्वच्छतेविषयी मार्गदर्शन केले जात आहे. ओला व सुका कचरा कसा साठवावा, त्याचे कशाप्रकारे फायदे आहेत, अशी विविध माहिती महिला कर्मचाऱ्यांकडून दिली जात आहे. घंटागाडी येण्यापूर्वी अर्धा तास अगोदर संबंधित ठिकाणी जाऊन जनजागृती केली जात आहे.