वीज बिलासाठी तगादा न लावण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:40 IST2021-01-23T04:40:50+5:302021-01-23T04:40:50+5:30
खंडाळा : ‘शेतकऱ्यांच्या शेतीपंपाच्या वीजबिलासाठी तगादा लावू नये. शेतकऱ्यांना सहकार्य करून शेतीपंपाचे ट्रान्स्फॉर्मर दुरुस्त करण्यात यावेत,’ अशी मागणी खंडाळा ...

वीज बिलासाठी तगादा न लावण्याची मागणी
खंडाळा : ‘शेतकऱ्यांच्या शेतीपंपाच्या वीजबिलासाठी तगादा लावू नये. शेतकऱ्यांना सहकार्य करून शेतीपंपाचे ट्रान्स्फॉर्मर दुरुस्त करण्यात यावेत,’ अशी मागणी खंडाळा तालुका शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने करण्यात आली.
खंडाळ्याच्या उपविभागीय वीज वितरण कार्यालयात उपअभियंता विलास शिर्के यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे
संचालक यांच्या पत्राच्या अनुषंगाने तालुक्यातील शेतकऱ्यांच्या थकीत वीज बिलाकरिता सहकार्य करावे. गतवर्षी कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले आहे. शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. कंपनीचे कर्मचारी शेतकऱ्यांना शेतीपंपाच्या वीज बिल भरण्याकरिता वारंवार तगादा लावत आहेत. मात्र ऊर्जा मंत्रालयाच्या पत्रानुसार वीज बिलाची रक्कम शेतकऱ्यांकडून पुढील आदेश निघण्यापर्यंत घेण्याचे थांबवावे अशा आशयाचे पत्र आहे. त्या अनुषंगाने शेतकऱ्यांना वीज बिलाची रक्कम भरण्याची सक्ती करु नये आणि शेतीपंपासाठी जे ट्रान्स्फॉर्मर नादुरुस्त अवस्थेत आहेत ते तत्काळ दुरुस्त करण्यात यावेत. त्याकरिता शेतकऱ्यांना थकीत वीज बिलापोटी काही ठराविक रक्कम भरण्यासाठीचा तगादा लावू नये. संविधानिक व लोकशाहीच्या मूल्यांचे रक्षण करुन सहकार्य करावे.
यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय जाधव, शरद ओव्हाळ, गणेश जाधव, प्रदीप सराटे, उत्तम जाधव, अब्दुल सत्तार, रमेश भोसले यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.