बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठविण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:45 IST2021-08-18T04:45:53+5:302021-08-18T04:45:53+5:30
चाफळ : न्यायालयाने बैलगाडी शर्यतीवर घातलेली बंदी उठवावी, तसेच बैलगाडी चालक, मालक, शौकीन यांच्यावर सराव काळात दाखल केलेले गुन्हे ...

बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठविण्याची मागणी
चाफळ : न्यायालयाने बैलगाडी शर्यतीवर घातलेली बंदी उठवावी, तसेच बैलगाडी चालक, मालक, शौकीन यांच्यावर सराव काळात दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत, यासाठी बैलगाडी चालक-मालक आणि शौकीन संघटना पाटण तालुका यांच्यावतीने सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, बळिराजाचा आधार असलेला बैल हा जंगली प्राणी नसून तो पाळीव प्राणी आहे. चारशे वर्षांपूर्वीची परंपरा असणाऱ्या सबंध महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा व हृदयस्पर्शी विषय ठरलेल्या बैलगाडी शर्यतीचा परंपरागत खेळ या बंदीमुळे संपुष्टात आला आहे. सर्वोच्च न्यायालयानेही बैल हा पाळीव प्राणी असल्याचे मान्य केले आहे. या पिढ्यान् पिढ्या चालत आलेल्या बैलगाडी शर्यतीवर घातलेली बंदी उठवण्यासाठी व चालक, मालक, शौकीन यांच्यावर नोंद केलेले गुन्हे मागे घेण्यात यावेत यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करावा.
यावेळी जावेद भैया तांबवे, आशिष पवार सरपंच चाफळ, अभिजित देवकर चाफळ, प्रकाश पवार, अनु देवकर, मयूर साळुंखे, महेश कुलकर्णी, निखिल बाबर, ऋषिकेश पवार, शंभू साळुंखे, संग्राम यादव उपस्थित होते.
चौकट :
बंदी उठविण्यासाठी आश्वासन
पाटणचे राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना बैलगाडी चालक-मालक व शौकीन संघटनेच्यावतीने निवेदन देण्यात आले. यावेळी पालकमंत्री बाबासाहेब पाटील यांनी, ‘याप्रश्नी आपणही आग्रही असून लवकरच बंदी उठवण्यासाठी प्रयत्न करू, नोंद केलेले गुन्हे मागे घेण्यासाठी तसेच शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय मार्गी लावण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा करणार आहे.’ असे सांगितले.