‘पे अॅण्ड पार्क’ सुरू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:40 IST2021-04-01T04:40:14+5:302021-04-01T04:40:14+5:30
उंब्रज : येथील बसस्थानकावर ‘पे अँड पार्क’ची व्यवस्था करावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. उंब्रज हे महामार्गावरील गाव असून, ...

‘पे अॅण्ड पार्क’ सुरू करण्याची मागणी
उंब्रज : येथील बसस्थानकावर ‘पे अँड पार्क’ची व्यवस्था करावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. उंब्रज हे महामार्गावरील गाव असून, परिसरातील विविध भागांतील नागरिक येथे खरेदी, शिक्षण, नोकरी व्यवसायासाठी येतात तसेच अनेकजण येथे येऊन पुढे नोकरीच्या गावाला जातात. मात्र, कुठेही सुरक्षित वाहन ठेवण्याची व्यवस्था नाही. रस्त्याकडेला वाहन उभे करताच पोलीस कारवाई करतात. येथील बसस्थानकाला मोठी जागा आहे तेथे कोठेही ‘पे अॅण्ड पार्क’ची व्यवस्था करता येईल. त्यादृष्टीने बसस्थानक व्यवस्थापनाने कार्यवाही करणे गरजेचे आहे.
बाटल्यांमुळे डोकेदुखी
कऱ्हाड : शहरातील कोल्हापूर नाक्यावरील गटारात प्लास्टिकसह काचेच्या बाटल्यांचा खच पडला आहे. कऱ्हाड व मलकापूर पालिकेच्यादृष्टीने ही डोकेदुखी ठरत आहे. सातत्याने गटारांची स्वच्छता करूनही मद्यपींकडून रिकाम्या बाटल्या गटारात टाकल्या जात आहेत. त्यामुळे गटर तुंबण्याचे प्रकार घडत आहेत. रिकाम्या बाटल्या गटारमध्ये टाकल्यामुळे पाईप तुंबून पाणी रस्त्यावर येते. त्यामुळे या प्रकाराबाबत कठोर उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
मलकापुरात उड्डाणपुलाखाली अतिक्रमण
मलकापूर : येथील कृष्णा रुग्णालयासमोर असलेल्या महामार्ग पुलाखाली चारचाकी वाहनचालक आपली वाहने दिवसभर उभी करत आहे. त्यामुळे पुलाखाली वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. सकाळी व सायंकाळच्या वेळेस या ठिकाणी कोंडी होत असून पोलिसांनी कारवाई करण्याची गरज आहे. अनेक वाहनधारक पुलाखाली वाहन उभे करून निघून जातात. दिवसभर ते तिकडे फिरकत नाहीत. त्यामुळे कोंडी झाल्यास वाहने हटवायची कशी, असा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी संबंधित वाहनधारकांवर कारवाई करण्याची गरज आहे.
तळमावले विभागात रानडुकरांचा उपद्रव
तळमावले : कुंभारगाव विभागात रानडुकरांकडून शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त बनले आहेत. विभागातील बहुतांश शेती बागायत आहे. पाण्याचे प्रमाण चांगले असल्यामुळे अनेक शेतकरी माळव्याची पिके घेतात. मात्र, रानडुक्करांकडून नुकसान होत असल्याने हातातोंडाशी आलेले पीक वाया जात आहे. वनविभागाने या डुकरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
रस्त्याची दुरावस्था
कोपर्डे हवेली : शहापूर ते अंतवडीला जाणारा अंतर्गत रस्ता खड्ड्यात आहे. रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून त्यामुळे चालकांना वाहने चालविताना कसरत करावी लागत आहे. मसूर ते पुसेसावळी मार्गाला पर्यायी रस्ता म्हणून हा रस्ता वापरला जातो. या रस्त्यावरून दुचाकीसह इतर वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. मात्र, सध्या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्यामुळे चालकांना वाहने चालविताना कसरत करावी लागत आहे.