डेरवण तलावाच्या पाणीसाठ्यात घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:37 IST2021-04-06T04:37:47+5:302021-04-06T04:37:47+5:30
कोयना जलसिंचन लघु पाटबंधारे खात्याअंतर्गत डेरवण पाझर तलावाची देखभाल केली जाते. डेरवणसह वाघजाईवाडी, गमेवाडी, खोणोली, शिंगणवाडी गावपरिसरातील शेतजमिनींना पाणी ...

डेरवण तलावाच्या पाणीसाठ्यात घट
कोयना जलसिंचन लघु पाटबंधारे खात्याअंतर्गत डेरवण पाझर तलावाची देखभाल केली जाते. डेरवणसह वाघजाईवाडी, गमेवाडी, खोणोली, शिंगणवाडी गावपरिसरातील शेतजमिनींना पाणी मिळावे, यासाठी १९६२ मध्ये डेरवण पाझर तलाव बांधण्यात आला. मात्र, गत काही वर्षांपासून या तलावाकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाल्याने शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. सध्या गमेवाडी व डेरवण येथील ग्रामस्थ तलावाच्या अधिकाऱ्यांशी सलगी करीत या तलावातील पाणी बिनधास्तपणे सोडत आहेत. मात्र, पाणी सोडल्यानंतर ते वेळेत बंद केले जात नाही. परिणामी पाण्याचा सतत निचरा होत असल्याने पाणीपातळी कमी होवून खोणोली ग्रामस्थांच्या शेतजमिनीस पाणी कमी मिळत आहे.
पाणी सोडण्याचे व बंद करण्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. योग्य नियोजनाअभावी पाणी सोडले जात असल्याने लवकरच तलावात ठणठणाट होण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
- चौकट
आठ ते दहा गावांसाठी तलाव वरदान
डेरवण पाझर तलाव परिसरातील शेतजमिनींना वरदान ठरला आहे. आठ-दहा गावांच्या शेतीची तहान भागविणाऱ्या या तलावातील पाण्याचे योग्य नियोजन व जतन करणे काळाची गरज बनली आहे. परिसरात सध्या कडक उन्हाळा जाणवत आहे. जनावरांची व शेतीची तहान भागणारा तलाव म्हणून डेरवण पाझर तलावाकडे पाहिले जाते. पाझर तलावानजीक असलेल्या निवासस्थानाकडेही संबंधितांचे दुर्लक्ष झाले आहे.