कांदा लागवडीत घट...
By Admin | Updated: November 9, 2014 23:35 IST2014-11-09T21:49:39+5:302014-11-09T23:35:36+5:30
विजेचे भारनियमन, पाण्याची उपलब्धता, खते, किटकनाशके व मजुरीच्या वाढलेल्या दरामुळे गतवर्षीच्या तुलनेत

कांदा लागवडीत घट...
सातारा : माण-खटाव तालुक्याचे प्रमुख नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कांदा पिकांची लागवड करण्यात बुध, ललगुण व डिस्कळ परिसरातील शेतकरी वर्ग गुंतला आहे. कांदा लागण आता अंतिम टप्प्यात आली असून विजेचे भारनियमन, पाण्याची उपलब्धता, खते, किटकनाशके व मजुरीच्या वाढलेल्या दरामुळे गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी कांदा लागवडीत निम्म्यापेक्षा जास्त घट झाल्याचे दिसून येत आहे.
सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सुरू झालेली कांदा लागण रब्बी पिकांच्या पेरणी दरम्यान काही काळ मंदावली होती. मात्र पेरणीची कामे उरकताच पुन्हा कांदा लागणीस वेग आला आहे. कांदा लागणीबरोबर सध्या परिसरात गहू व ज्वारी पिकांच्या आंतरमशागतीची कामे सुरू असल्याने कांदा लागणीसाठी महिला मजुरांची मोठी चणचण भासत आहे. त्यामुळे अनेक शेतकरी भारनियमनाच्यावेळा सांभाळत कांदा लागण करत आहेत. मोठे शेतकरी महिला मजुरांच्या गटांमार्फत कांदा लागण करताना दिसत आहेत. वाफ्यामध्ये पाण्यात लागण करण्यास एकरी सहा हजार रुपये व गादी वाफ्यावर लागवड करण्यास सात हजार रुपये मजुरी घेण्यात येत आहे. कमी कालावधीमध्ये हमखास पैसे मिळवून देणारे नगदी पीक म्हणून या पिकाकडे पाहिले जाते. उत्तर खटाव परिसरात डिस्कळ, गारवडी, शिंदेवाडी, ललगुण, नागनाथवाडी, फडतरवाडी, बुध, काटेवाडी, वेटणे, राजापूर, पांगरखेल आदी गावातील शेतकरी दरवर्षी रब्बी हंगामात सुमारे दीडशे ते दोनशे एकर क्षेत्रावर कांद्याची लागवड करतात. यावर्षी कांदा लागण घटल्याचे दिसून येत आहे. बियाण्याचे वाढलेले दर, खतांच्या वाढलेल्या किमती, किटकनाशके व मजुरीच्या दरात झालेली वाढ, प्रतिकूल हवामान, दर घसरणीचा परिणाम कांदा लागणीवर झाल्याचे दिसत आहे. (प्रतिनिधी)
इतर पिकांवर भर...
कांदा या पिकात हमखास पैसे मिळण्याऐवजी शेतकऱ्यांना नुकसानच सोसावे लागत आहे. त्यामुळे यावर्षी बहुतांश शेतकऱ्यांनी कांदा लागवडीकडे पाठ फिरवली असल्याचे दिसून येत आहे. यंदा अनेक शेतकऱ्यांचा बटाटा, आले, ऊस व अन्य पिकांवर भर दिल्याचे दिसून येत आहे.