जुन्या मिळकतींना पन्नास टक्क्यांपर्यंत घसारा
By Admin | Updated: January 2, 2015 00:13 IST2015-01-01T22:06:14+5:302015-01-02T00:13:11+5:30
मलकापूर : दिवाबत्ती व आरोग्य करात शंभर टक्के सूट

जुन्या मिळकतींना पन्नास टक्क्यांपर्यंत घसारा
मलकापूर : ‘नगरपंचायतीने नव्यानेच लागू केलेल्या मूल्यवर्धित कर आकारणीत नागरिकांच्या हरकतींचा विचार करता २००१ पूर्वीच्या सर्व इमारतींना अनुक्रमे दहा, तीस व पन्नास टक्क्यांपर्यंत घसारा मिळणार आहे़ याशिवाय नगरपंचायतींच्या वतीने आकारण्यात येणाऱ्या दिवाबत्ती करात शंभर टक्के सूट देण्याचा निर्णय घेतला आहे,’ अशी माहिती उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी दिली़ शिंदे म्हणाले, ‘नगरपंचायत स्थापनेपासून संकलित कर आकारणी लागू केली नव्हती़ शासनाच्या नियमानुसार मूल्यवर्धित कर आकारणी लागू करणे बंधनकारक आहे़ जिल्ह्यातील इतर नगरपालिकांच्या तुलनेत मलकापूर नगरपंचायतीने सर्वात कमी भाडेमूल्य निश्चित केले आहे़ ते दर नगररचना विभागाकडून निश्चित केलेले आहेत़ शिवसेनेसह इतर संघटना व नागरिकांनी घेतलेल्या हरकतींचा विचार करून २००१ पूर्वी बांधण्यात आलेल्या आरसीसी़ इमारतींना दहा टक्के, दगड-वीट, सिमेंट, माती, पत्रा इमारतींना तीस टक्के तर पत्र्याच्या शेडना पन्नास टक्के घसारा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे़ तसेच ज्या मिळकतदारांनी मलकापूर शहर सोलर सिटी अंतर्गत उपकरणे बसविली आहेत़, अशा सर्व मिळकतदारांना दहा टक्के सूट देण्यात येणार आहे़ त्याचबरोबर नगरपंचायतींकडून आकारण्यात येणारा दिवाबत्ती व आरोग्य करात शंभर टक्के सूट देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे़ महाराष्ट्र शिक्षण, रोजगार हमी व वृक्षकर हे उपकर असून, ते जसेच्या तसे शासनाला भरणे बंधनकारक आहेत़ या करांबाबत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून हे कर भाडेमूल्यावर आधारित आकारण्याऐवजी कर योग्य रकमेवर आकारण्यात यावेत, या मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले़ (प्रतिनिधी)