चिमण्यांची घटती संख्या जैवविविधतेला हानिकारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:38 IST2021-03-20T04:38:40+5:302021-03-20T04:38:40+5:30
मलठण : जागतिक चिमणी दिवसानिमित्त ‘या चिमण्यांनो, परत फिरा रे...’ या ओळी चिमण्यांसाठी खऱ्या ठरत आहेत. चिमणी हा आयुष्यातील ...

चिमण्यांची घटती संख्या जैवविविधतेला हानिकारक
मलठण : जागतिक चिमणी दिवसानिमित्त ‘या चिमण्यांनो, परत फिरा रे...’ या ओळी चिमण्यांसाठी खऱ्या ठरत आहेत. चिमणी हा आयुष्यातील एक जवळचा पक्षी आहे; पण ही चिमणी अनेक संकटांना तोंड देत आहे. चिमण्यांची कमालीची घटती संख्या जैवविविधतेला धोका निर्माण करू शकते.
एरव्ही अंगणात, परसबागेत समूहाने दिसणारी, लहानपणी पाहिलेली, शिकलेली, अनुभवलेली चिमणी आज दुर्मीळ झाली आहे. ती क्वचितच अंगणात दिसते. ‘एक घास चिऊचा’ म्हणत आपण कितीतरी घास लहानपणी खाल्ले असतील; पण आज तोच एक घास चिमणीला मिळत नाही.
पूर्वी सहज नजर टाकली तर एक तरी चिमणी दिसायची. घरांच्या जंगलात चिमण्यांची घरटी आणि चिमण्याच हरवून गेल्या आहेत. सध्या तरी चिमणी काळाच्या ओघात दिसेनाशी झाली. आताच्या पिढीला चिमण्यांचा चिवचिवाट कानी पडणे दुर्मीळ झाले आहे. कविता, बडबडगीते यांतच चिमणी शिल्लक राहते की काय, अशी भीती निर्माण झाली आहे.
मलटण व परिसरात चिमण्यांचे थवे शेतशिवारात तसेच घराजवळ असणाऱ्या बागेत दिसत आहेत. काही घरांतील महिला व मुलांनी या चिमण्यांसाठी पाणी व धान्य ठेवले आहे. शेतात पिकणारं पहिलं धान्य आपल्या लाडक्या चिऊताईसाठी ठेवलं जातं. या ठेवलेल्या घासासाठी चिऊताईही हक्काने परसबागेत येते.
चिमण्या आणि इतर पक्ष्यांचे नैसर्गिक संरक्षण करणे गरजेचे आहे. यासाठी जागृती व अभ्यास गरजेचा आहे. चिमणी अजूनही शेत शिवारात शिल्लक आहे. पूर्वी मोठ्या प्रमाणात असणारी चिमणी लक्षात यावी इतकी घटली आहे. शहरातील मध्यवस्तीतील चिमण्या दिसेनाशा झाल्या आहेत. चिमणीला अभय मिळावे व ती थव्याथव्यांनी दिसावी. त्यासाठी एक घास चिऊताईसाठी नक्की काढून ठेवला पाहिजे.
चौकट :
पिल्लांसाठी मिळेनात अळ्या अन् कीटक
चिमण्यांचे संरक्षण आणि त्याविषयीच्या जागृतीसाठी २० मार्च हा दिवस ‘जागतिक चिमणी दिवस’ म्हणून साजरा करतात. ‘चिमण्या कमी होण्याची अनेक कारणे सांगितली जातात. त्यात नवीन पद्धतीच्या इमारतींत त्यांंना घरट्यासाठी जागाच मिळत नाही. त्यांच्या विणीच्या हंगामात पिल्लांना भरविण्यासाठी अळ्या, कीटक मिळत नाहीत. शेतीच्या बदलत्या पद्धतीमुळे चिमण्या कमी होत आहेत, अशी माहिती फलटण येथील पक्षितज्ज्ञ डॉ. रूपेश यादव यांनी दिली.