प्रतापगड, अजिंक्यतारा राष्ट्रीय स्मारक घोषित करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:16 IST2021-02-06T05:16:13+5:302021-02-06T05:16:13+5:30
सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांनी मोठ्या पराक्रमाने आणि शौर्याने स्वराज्याची निर्मिती केली. हाच ऐतिहासिक ठेवा भावी पिढीसाठी प्रेरणादायी असून, ...

प्रतापगड, अजिंक्यतारा राष्ट्रीय स्मारक घोषित करा
सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांनी मोठ्या पराक्रमाने आणि शौर्याने स्वराज्याची निर्मिती केली. हाच ऐतिहासिक ठेवा भावी पिढीसाठी प्रेरणादायी असून, त्याच्या संवर्धनासाठी राष्ट्रीय पातळीवर प्रयत्न होणे गरजेचे आहे. विशेषत: किल्ले अजिंक्यतारा आणि प्रतापगडाचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन केंद्र सरकारने या किल्ल्यांना राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करून त्यांचे संवर्धन करावे, याबाबतची मागणी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्याकडे केली आहे.
यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा वारसा सांगून महाराजांच्या पराक्रमाचा अमूल्य असा ऐतिहासिक ठेवा संपूर्ण देशात पाहायला मिळत असल्याचे निदर्शनास आणून दिले. तसाच वारसा सातारा जिल्ह्याला लाभला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा साम्राजाच्या पाऊलखुणा आजही कायम आहेत. तोच वारसा जतन करण्याचा प्रयत्न आम्ही करत असल्याचे खासदार उदयनराजे यांनी सांगितले.
सातारा जिल्ह्याला सुमारे २० किल्ल्यांचा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. विविधतेने नटलेल्या सातारा जिल्ह्याची शान वाढवणाऱ्या प्रतापगड आणि अजिंक्यतारा हे दोन्ही किल्ले राष्ट्रीय स्मारक म्हणून संरक्षित करण्याची मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्याकडे केली आहे.
मराठा साम्राजाची राजधानी असलेल्या सातारा येथील अजिंक्यतारा किल्याला फार मोठे ऐतिहासिक महत्त्व आहे. सातारा शहरात मोठ्या डौलाने उभा असलेला हा किल्ला जतन करण्याची मागणी उदयनराजे यांनी केली. त्याचबरोबर प्रतापगडाची लढाई ही महाराष्ट्राच्या इतिहासातील एक महत्त्वाची लढाई आहे. ही मराठा साम्राजाच्या इतिहासातील सर्वात रोमांचक घटना मानली जाते. शिवाजी महाराजांनी आदिलशहाचा सेनापती अफजलखानाच्या रूपाने आलेले स्वराज्यावरील संकट परतवून लावताना, त्याचा शेवट करून याच मातीत त्याची कबर बांधली. या लढाईत महाराजांनी गनिमी काव्याने शत्रूला संपवले नसते तर इतिहास कदाचित वेगळा पाहायला मिळाला असता. इतकच नाही तर स्वराज्याची निर्मितीसुद्धा झाली नसती. आणि या देशातील लोकशाही पाहायला मिळाली नसती. त्यामुळे महाराजांच्या गनिमी काव्याचा इतिहास प्रतापगडाच्या रूपाने जतन करावा जेणेकरून तो साऱ्या जगाला प्रेरणादायी ठरेल. त्यासाठी प्रतापगडला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्याची मागणी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी यावेळी केली आहे.
राजमुद्रेची प्रतिकृती दिली भेट..
छत्रपती उदयनराजे भोसले यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांची दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी उदयनराजे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेची प्रतिकृती उपराष्ट्रपतींना सन्मानपूर्वक भेट दिली. याआधी आपण स्वतः छत्रपती शिवाजी महाराज यांचा खंदा प्रशंसक आहे. तसेच देवी भवानीचा उपासक असल्याचे सांगून उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी छत्रपती शिवाजी महाराजांप्रति आदर व्यक्त केला होता.
फोटो नेम : ०५उदयनराजे
फोटो ओळ : दिल्ली येथे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांची भेट घेऊन खासदार उदयनराजे भोसले यांनी त्यांना राजमुद्रेची प्रतिकृती भेट दिली.