कराड : नवीन शैक्षणिक धोरणांमुळेच पहिलीपासून हिंदी शिकवण्याचा निर्णय राज्य सरकारने स्वीकारला आहे. याबाबत वेगवेगळी मतमतांतरे असली तरी शिक्षणतज्ञ, लेखक अभ्यास करून काय मत मांडतील. त्यावरती सरकार निर्णय घेईल असे मत विधानपरिषदच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. निलमताई गोरे एका खासगी कार्यक्रमासाठी कराड येथे आल्या होत्या. त्यावेळी त्या माध्यमांशी बोलत होत्या.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत विचारले असता त्या म्हणाल्या, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नेमक्या कधी होतील याची अजून नीट स्पष्टता नाही. महायुतीचे नेते निवडणूक एकत्रिक की स्वतंत्र लढायच्या याचा निर्णय घेतील असे सांगत आमच्या पक्षाची भूमिका आमचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाहीर करतील असेही त्यांनी सांगणे पसंद केले.
कर्जमाफी वरून शेतकरी नाराज असल्याच्या प्रश्नावर बोलताना गोरे म्हणाल्या, खरंतर महाविकास आघाडीला लोकसभेमध्ये चांगले यश मिळाले. त्यामुळे आघाडीच्या नेत्यांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. पण विधानसभेला त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही. त्यामुळे सध्या आघाडीचे नेते अस्वस्थ असून रोज एका ठिकाणी ते आंदोलन करीत आहेत. सरकार व जनता यांच्या मधला संवाद बिघडवण्याचे काम ते करत असल्याचा आरोप नीलम गोऱ्हे यांनी यावेळी केला.
लाडक्या बहिणींच्या बाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना त्या म्हणाल्या, लाडक्या बहिणींच्या कागदपत्र पडताळणी वरुन महिलांनी नाराज होऊ नये. शासन प्रत्येक स्तरावर प्रत्येक समाजासाठी विविध महामंडळ स्थापन करून त्यांना न्याय देण्याचे काम करीत आहे. मी अनेक लाडक्या बहिणीशी बोलले आहे. त्या बहिणी नाराज नसल्याचे दिसून येते असेही त्या म्हणाल्या.
त्यात फक्त 'र' चे साम्य आहे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरे गावाला आले की ते नाराज असल्याच्या चर्चा सुरू होतात? याबाबत छेडले असता नीलम गोऱ्हे म्हणाल्या, त्यात काही तथ्य नाही. दरे व नाराज या दोन शब्दात फक्त 'र' चे साम्य आहे.
सगळ्या गोष्टी माध्यमातून सांगायची पद्धत नाही
राज ठाकरे व एकनाथ शिंदे यांची काही दिवसांपूर्वी एकत्रित भेट झालीय. मुंबईच्या निवडणुकीत शिवसेना व मनसे एकत्र लढण्याची शक्यता आहे काय? याबाबत छेडले असता नीलम गोऱ्हे म्हणाल्या, आमच्याकडे सगळ्या गोष्टी माध्यमातुन जाहीर करण्याची पद्धत नाही. काही गोष्टी गुपचूप कराव्या लागतात. म्हणून तर राज्यात एवढे मोठे परिवर्तन झाले.