आठ नगरसेवकांना अपात्र ठरवा
By Admin | Updated: January 6, 2015 00:48 IST2015-01-05T23:37:06+5:302015-01-06T00:48:49+5:30
महाबळेश्वर पालिका : डी. एम. बावळेकर यांची मागणी

आठ नगरसेवकांना अपात्र ठरवा
महाबळेश्वर : ‘पालिकेत सत्तेवर असलेल्या महाबळेश्वर विकास आघाडीच्या आठ नगरसेवकांनी पक्षांतर बंदी कायद्याचा भंग केला आहे. त्यामुळे त्यांना अपात्र ठरवावे,’ अशी मागणी माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर यांनी केली आहे.
जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाबळेश्वर पालिकेच्या २०११ मध्ये झालेल्या निवडणुकीत चार प्रभागांतून सतरा नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामध्ये लोकमित्र जनसेवा आघाडीचे आठ तर नऊ नगरसेवक अपक्ष निवडून आले. अपक्ष नगरसेवकांपैकी आठ जणांनी एकत्र येऊन महाबळेश्वर विकास आघाडीची स्थापना केली. या आघाडीची सभा घेऊन त्यांनी पक्षनेता, उपनेता, पक्षप्रतोद यांची निवड केली. तसेच आघाडीची घटनाही तयार केली. जिल्हाधिकाऱ्यांनी आघाडीला कायदेशीर मान्यताही दिली आहे. त्यामुळे सत्ताधारी गटातील नगराध्यक्षा उज्ज्वला तोष्णिवाल, नगरसेवक कुमार शिंदे, संदीप साळुंखे, प्रकाश पाटील, संगीता वाडकर, सुरेखा आखाडे, लीला मानकुमरे, विमल पार्टे आघाडीचे म्हणजेच, एका नवीन पक्षाचे अधिकृत सदस्य झाले.
त्यामुळे अंतर्गत निवडणुकीत आघाडीतर्फे निवडणूक लढविणे आवश्यक आहे. मात्र २०१२-१३ मध्ये झालेल्या विषय समित्यांच्या सदस्य व सभापती निवडणुकीत आठही नगरसेवकांनी आघाडीतर्फे न लढवता अपक्ष नगरसेवक म्हणून लढविली आहे. २०१२ मध्ये आठही नगरसेवकांनी नंदकिशोर भांगडिया यांना नामनिर्देशित नगरसेवक म्हणून नियुक्त केले. त्यांच्या नामनिर्देशन पत्रात आठही नगरसेवकांनी ‘अपक्ष सदस्यांचा एकत्रित गट’ म्हणून नमूद केले. त्याचप्रमाणे गटनेतेपदी निवड करताना दिलेले लेखी पत्रात स्वत:चा उल्लेख अपक्ष सदस्य असाच केला आहे. जुलै २०१४ मध्ये विविध विषय समित्यांच्या सभापतिपदाचे उमेदवारी अर्ज सर्व नगरसेवकांनी अपक्ष नगरसेवक ‘अपक्ष गट’ असा स्वत:चा उल्लेख करून महाबळेश्वर विकास आघाडीचे अस्तित्व लपविले. आठही नगरसेवकांनी सर्व निवडणुका अपक्ष नगरसेवक असल्याप्रमाणे लढविल्या; परंतु १६ डिसेंबरला झालेल्या विविध विषय समित्यांच्या निवडणुकीच्या नामनिर्देशन पत्रात सर्व नगरसेवकांनी ‘महाबळेश्वर विकास आघाडीचे सदस्य’ असा उल्लेख केला व प्रथमच आघाडीतर्फे निवडणूक लढविली. त्याच दिवशी विषय समित्यांच्या सभापती निवडणुकीत मात्र या नगरसेवकांनी ‘अपक्ष’ म्हणून उमेदवारी अर्ज सादर केले. त्यामुळे त्यांच्याकडून पक्षांतर बंदी कायद्याचा भंग झाला आहे. त्यांना अपात्र घोषित करण्याची मागणी बावळेकर यांनी केली
आहे. (प्रतिनिधी)
पाचगणीची पुनरावृत्ती
पाचगणी पालिकेतील अपक्ष नगरसेवकांनी निवडणुकीनंतर याचपद्धतीने लक्ष्मी कऱ्हाडकर यांच्या नेतृत्वाखाली पाचगणी विकास आघाडीची स्थापना केली होती. आघाडीतील सुलभा लोखंडे यांनीही आघाडीचे सदस्यत्व स्वईच्छेने सोडल्याने त्यांनाही नगरसेवकपद गमवावे लागले होते. त्यामुळे महाबळेश्वरमधील आठ जणांवर कारवाई होईल, असा विश्वास बावळेकर यांनी व्यक्त केला.