जखमी बिबट्याचा अखेर मृत्यू
By Admin | Updated: June 20, 2014 00:30 IST2014-06-20T00:23:33+5:302014-06-20T00:30:28+5:30
भूकबळी : आगाशिवच्या पायथ्याला अंत्यसंस्कार

जखमी बिबट्याचा अखेर मृत्यू
मलकापूर : विंग (ता. कऱ्हाड) येथील उसाच्या शेतातून जेरबंद केलेल्या मादी बिबट्याचा आज, गुरुवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. अशक्तपणामुळे बिबट्या दगावल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले आहे. दरम्यान, सायंकाळी आगाशिव डोंगरालगत बिबट्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
विंग येथील कणसे मळा शिवारात शंकर कणसे यांच्या उसाच्या शेतात काल, बुधवारी बिबट्याची मादी आढळली होती. जयवंत कणसे व संतोष कणसे हे दोघेजण शेतात गेले असता त्यांना या बिबट्याचे दर्शन झाले. त्यांनी याबाबतची
माहिती वनविभागाला दिली. त्यानंतर वनक्षेत्रपाल भरत पाटील, बी. के. जाधव, एस. जे. संकपाळ, बाबूराव पाटील, राजेंद्र सोनवणे, गवते, सागर कुंभार, वनकर्मचारी त्याठिकाणी दाखल झाले. त्यांनी काही अंतरावरूनच बिबट्याच्या हालचालींचे निरीक्षण केले. त्यावेळी तो जखमी व उपाशीपोटी असल्याचे वनाधिकाऱ्यांना जाणवले. बिबट्याची प्रकृती गंभीर असल्याचे निदर्शनास आल्यानंतर वनक्षेत्रपाल भरत पाटील यांच्यासह कर्मचाऱ्यांनी शिताफीने त्याला ताब्यात घेत पिंजऱ्यात घातले. त्यानंतर त्याला कऱ्हाडच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात आणले. तेथे त्याच्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर अधिक उपचारासाठी त्याला सुरक्षितस्थळी हलविले.
बुधवारी रात्रीपासून बिबट्यावर उपचार सुरू होते. रात्री त्याला खाण्यासाठी मांस टाकले होते. मात्र, ते मांसही बिबट्याने खाल्ले नाही. तसेच उपचारालाही त्याच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास बिबट्याचा मृत्यू झाला. मानद वन्यजीवरक्षक रोहन भाटे यांच्यासह इतर पंचांसमक्ष पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. दिनकर बोर्डे यांनी शवविच्छेदन केले. (प्रतिनिधी)