कोरोनाकाळात सरणावरही मरण काही पूर्ण होईना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:27 IST2021-06-05T04:27:50+5:302021-06-05T04:27:50+5:30
कुडाळ : ‘खरंच जगणं आणि मरण यातील अंतर इतकं जवळ येईल, असं कधी वाटलंच नाही. मरणानंतरही सरणासाठी वाट पाहत ...

कोरोनाकाळात सरणावरही मरण काही पूर्ण होईना!
कुडाळ : ‘खरंच जगणं आणि मरण यातील अंतर इतकं जवळ येईल, असं कधी वाटलंच नाही. मरणानंतरही सरणासाठी वाट पाहत बसावी लागेल हेही आज खरं वाटत नाही; पण परिस्थिती तशीच आहे. यामुळे एकामागोमाग एक सरणावरच्या चितेने भडका घेऊन मरणही काही पूर्ण होत नाही. अशी काहीशी अवस्था कोरोनाच्या काळात आज जगायला मिळतेय ही मानवी उत्क्रांतीची सर्वोच्च उन्नतीच म्हणायला हवी.
पूर्वीच्या काळी प्लेगच्या महाभयंकर साथीत असंच घडत होतं. एकामागून एक चिता पेटत होत्या. आजही काहीशी अशीच परिस्थिती पुन्हा निर्माण झाली आहे. इथं मात्र पोहोचवायला दवाखान्याची गाडी. चितेला दूरवरूनच अग्नी देत भडकणाऱ्या ज्वालांनी डोळ्यांतून आणि कंठांतून दिसणारा आक्रोश तिथंच गळून पडतोय. दुःखभावना विरून गेल्यासारख्या चार भिंतीआड एकट्यालाच उद्ध्वस्त करत आहेत. स्मशानभूमीत एकामागोमाग एक सरणही यामुळे मरणसुद्धा पूर्ण होऊ देत नाही, अशीच अवस्था झाली आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी भयावह ठरली. यामध्ये अनेकांना प्राणाला मुकावे लागले. काही कुटुंबांतील कर्तेमंडळीच यात गेली. अनेकांचा मायेचा आधार हरपला, मुले निराधार झाली. वेशीपल्याड असणारा हा कोरोना कधी गावात शिरला हे कळलंच नाही. अनेकांच्या कुटुंबातील साऱ्याच व्यक्ती यामध्ये अडकल्या. मात्र, धैर्याने सामोरे जात योग्य उपचारपद्धतीने काहींनी त्यावर मातही केली. अशा कठीण प्रसंगात माणुसकीचा हात देणारे पुढे सरसावले. मिळेल ती मदत देत या रुग्णांना वाचवण्यासाठी त्याची धडपड आजही सुरू आहे.
चौकट..
कोरोनाच्या चक्रव्यूहात माणूस!
आजच्या परिस्थितीत नातेवाईक, आप्तेष्ट दूरवरूनच संवादात आहेत. मरणानंतरच्या विधीलाही आता फारसं कोणी येईना. कोरोनाच्या या चक्रव्यूहात माणसापासून माणूसच दूर नेला. या साऱ्यात मात्र पैसा, धनदौलत सर्वच जागेवर राहिलं. माणसाला खऱ्या जगण्याची किंमत कळून चुकली. यामुळे मानवता आणि माणुसकी हे जपणं हेच जीवन आहे, याची जाणीव होत माणसाला जगण्याची खरी किंमत कळली.