कऱ्हाडात बेकायदा रिक्षांचे ‘डेथ वॉरंट’!

By Admin | Updated: August 28, 2015 22:52 IST2015-08-28T22:52:50+5:302015-08-28T22:52:50+5:30

आरटीओसोबत पोलिसांची संयुक्त कारवाई : चार दिवसांत ७२ जणांना हिसका; ३८ जणांकडून दीड लाखाचा दंड वसूल; नऊ वाहने निलंबित

'Death warrant' for illegal raksh in Karhad! | कऱ्हाडात बेकायदा रिक्षांचे ‘डेथ वॉरंट’!

कऱ्हाडात बेकायदा रिक्षांचे ‘डेथ वॉरंट’!

संजय पाटील - कऱ्हाड अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांभोवतीचा फास दिवसेंदिवस आवळला जातोय. काही दिवसांपूर्वी भर बैठकीत रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बेकायदा रिक्षांविरोधात आवाज उठविला होता. त्यानंतर याची गंभीर दखल घेत पोलिसांसह परिवहन विभागानेही कंबर कसली. अवैधरीत्या होणारी प्रवासी वाहतूक रोखण्यासाठी पोलीस व परिवहनचे संयुक्त पथक तयार करण्यात आले. या पथकाने गेल्या चार दिवसांत तब्बल ७२ रिक्षांवर कारवाई केली आहे. कऱ्हाड शहरात अ‍ॅपेरिक्षा आणि तीन आसनी रिक्षांची स्वतंत्र गेट आहेत. स्वतंत्र संघटना आणि स्वतंत्र थांबे आहेत. तीन आसनी रिक्षावाल्यांमध्येही ‘परमिट’ अन् ‘प्रायव्हेट’चा कलगीतुरा अनेक वर्षांपासून रंगतोय. दिवसभर आम्ही नंबरला ताटकळत राहतो आणि ‘प्रायव्हेट’वाले बेधडकपणे प्रवाशांची उचलाउचली करतात, असा परमिटधारकांचा आरोप आहे. याउलट परमिट मिळतच नाही तर आम्ही काय करू, असं स्पष्टीकरण ‘प्रायव्हेट’ म्हणजेच खासगी रिक्षाधारकांकडून दिलं जातंय. सध्या हा वाद चांगलाच रंगला आहे. काही दिवसांपूर्वी कऱ्हाडातील वाहतूकप्रश्नी पोलीस, परिवहन अधिकारी व रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी चांगलीच आगपाखड केली. शहरात दोन हजारांहून जास्त अवैध रिक्षा असल्याचा आरोप त्यावेळी करण्यात आला होता. त्यामुळे या अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात विशेष मोहीम हाती घेण्याचा निर्णय पोलीस उपअधीक्षक राजलक्ष्मी शिवणकर व परिवहन अधिकारी स्टिव्हन अल्वारीस यांनी घेतला. त्यासाठी पोलिसांसोबत मोटार वाहन निरीक्षक सचिन आडके, विवेक भोसले, बजरंग जाधव यांचे संयुक्त पथक तयार करण्यात आले. मंगळवारपासून या पथकाने ठिकठिकाणी कारवाई करण्यास सुरुवात केली. गत चार दिवसांत पथकाने तब्बल ७२ रिक्षांवर कारवाई केली आहे. त्या रिक्षांवर परिवहन विभागाने खटलेही दाखल केले आहेत. कारवाई केलेल्या ७२ रिक्षावाल्यांपैकी ३८ जणांनी दंड भरून खटले निकाली काढले. त्यातून १ लाख ५५ हजार ४०० रुपयांचा महसूल परिवहनला मिळला. मात्र, अद्यापही कारवाई केलेल्यांपैकी ३४ रिक्षा परिवहनच्या ताब्यात
आहेत. वास्तविक, ‘परमिट’ आणि ‘प्रायव्हेट’ हा रिक्षाधारकांमधील वाद अनेक महिन्यांपासूनचा आहे. वेगवेगळ्या मार्गांवर प्रवासी वाहतूक करणाऱ्या अ‍ॅपेरिक्षांची शहरात स्वतंत्र गेट आहेत. या गेटवर दरवेळी शेकडो अ‍ॅपेरिक्षा थांबलेल्या असतात. असे असताना संबंधित गेटपासून काही अंतरावरच ‘प्रायव्हेट’वाले प्रवाशांना त्यांच्या रिक्षामध्ये घेतात. त्यामुळे परमिट असूनही अनेक रिक्षावाल्यांना प्रवासी मिळत नाहीत. त्यामुळे यापूर्वी वेळोवेळी वादावादीच्या घटना घडल्या आहेत.


प्रवाशांच्या पळवापळवीमुळे ‘वडाप वॉर’!
एक वेळ अशी होती की, वडाप वाहनात जागा मिळविण्यासाठी प्रवाशांना धडपड करायला लागायची; पण सध्या वडापवाल्यांकडूनच प्रवाशांची ओढाओढी केली जातेय. एवढंच नव्हे, तर प्रवाशांवर ‘हक्क’ सुध्दा सांगितला जातोय. त्यामुळे प्रवाशांची पळवापळवी होताना दिसली की वडापवाले एकमेकांच्या अंगावर धावून जातायत. तसेच रिक्षा गेटचे सदस्य ‘प्रायव्हेट’वाल्यांवर वॉच ठेवतायत. या स्थितीमुळे काही दिवसांत ‘वडाप वॉर’चा भडका उडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
परजिल्ह्यातील ‘पासिंग’वाल्यांची घुसखोरी
कऱ्हाडात सध्या परजिल्ह्यातील पासिंग असलेल्या अ‍ॅपेरिक्षांतून प्रवासी वाहतूक केली जात आहे. काही रिक्षा सांगली तर काही कोल्हापूर तसेच पुणे व मुंबई पासिंगच्या आहेत. यातील काही रिक्षांना परमिट आहे. मात्र, त्या-त्या जिल्ह्यांतील ग्रामीण परवाना असल्याने अशा रिक्षांना येथे प्रवासी वाहतूक करता येत नाही. असे असतानाही सध्या अनेक रिक्षा शहरात वावरताना दिसतात. त्या रिक्षांवरही परिवहन विभागाची सध्या करडी नजर आहे.


वाहनांच्या नोंदणीचे निलंबन
अवैधरीत्या प्रवासी वाहतूक करताना खासगी रिक्षा अथवा दुसरे कोणतेही वाहन आढळल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते. त्याचबरोबर संबंधित वाहन निलंबितही करण्यात येते. कारवाईनंतर संबंधित वाहन परिवहन विभाग किंवा पोलिसांच्या ताब्यात असते. निलंबनाच्या कालावधीत ते वाहन रस्त्यावर येऊ दिले जात नाही. सध्या नऊ रिक्षांवर परिवहन विभागाने ही कारवाई केली आहे.
कऱ्हाडातील अ‍ॅपेरिक्षा थांबे
१) विजय दिवस चौक - कोपर्डे हवेली, कारखाना, मसूर
२) स्टेट बँकेसमोर - ओगलेवाडी, करवडी, वाघेरी, राजमाची
३) जुने राजमहाल टॉकीज - कार्वे, कोरेगाव, शेरे, दुशेरे
४) बिरोबा मंदिर - चचेगाव, विंग, येरवळे, घारेवाडी
५) भूविकास बँकेसमोर - वाठार, आटके, रेठरे बुद्रुक, कारखाना
६) दत्त चौक - वनवासमाची, खोडशी, वहागाव, घोणशी
७) शालीमार लॉज - विजयनगर, सुपने, वसंतगड, साकुर्डी
८) शालीमार लॉज - तांबवे, उत्तर तांबवे, बेलदरे, विहे

Web Title: 'Death warrant' for illegal raksh in Karhad!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.