ब्लॅंकेटच्या धाग्यांचा बनविला मृत्यूचा दोरखंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:37 IST2021-08-29T04:37:47+5:302021-08-29T04:37:47+5:30
सातारा : साताऱ्यातील बालसुधारगृहात त्याला गुरुवारी सायंकाळी दाखल करण्यात आले. इथं आल्यानंतर तो तणावातच होता. त्या रात्री फारसं जेवणही ...

ब्लॅंकेटच्या धाग्यांचा बनविला मृत्यूचा दोरखंड
सातारा : साताऱ्यातील बालसुधारगृहात त्याला गुरुवारी सायंकाळी दाखल करण्यात आले. इथं आल्यानंतर तो तणावातच होता. त्या रात्री फारसं जेवणही त्याने केलं नाही. सकाळी उठल्यानंतर इतर मुलांसोबत तो बोलतही नव्हता. त्याच्या मनात आत्महत्येचे विचार घोळत होते. मुलांची नजर चुकवून तो ब्लॅंकेटचे धागे काढू लागला. शुक्रवारी रात्रभर त्याने ब्लॅंकेटचे इतके धागे काढले की, त्याचा दोरखंड तयार झाला. सरतेशेवटी याच दोरखंडने त्याने इतर मुले झोपेत असताना मृत्यूला कवटाळले.
नात्यातीलच एका मुलीला त्याने काही दिवसांपूर्वी पुण्याला पळवून नेले. मुलगी सज्ञान, तर मुलगा अल्पवयीन. मुलीच्या नातेवाइकांनी वडूज पोलीस ठाण्यात मुलीला पळवून नेल्याची तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी मुलाला ताब्यात घेतले. मुलीचीही वैद्यकीय चाचणी झाली. त्यामध्ये मुलीवर अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला. तो अल्पवयीन असल्यामुळे त्याची साताऱ्यातील बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली. इथे आल्यानंतर तो कावराबावरा झाला होता. एकही शब्द तो कोणाशी बोलायचा नाही. कर्मचाऱ्यांनी गुरुवारी रात्री त्याला झोपण्यासाठी एक चादर आणि ब्लॅंकेट दिले. इतर मुलांच्या शेजारी तो लवकर झाेपला. मात्र, रात्री झोपेतून अचानक उठून ब्लॅंकेटचे धागे काढू लागला. हा प्रकार एका मुलाच्या लक्षात आल्यानंतर त्याने काय करतोयस, असं विचारलं. तेव्हा त्यानं काही नाही. तू झोप. असं म्हणून तोही झोपी गेला. शुक्रवारी सकाळी नाश्टा केल्यानंतर तो शांतच होता. दिवसभर तो कोणाशी बोलला नाही. एकटक पाहत बसायचा. सायंकाळी आठला जेवण झाल्यानंतर सर्व मुले आपापल्या खोलीमध्ये झोपण्यासाठी गेली. त्यावेळी हा संबंधित मुलगा सगळ्यात अगोदर झोपला होता; पण खरं तर त्याने झोपेचं सांग घेतलं होतं. इतर मुले झोपल्याचे पाहून तो उठला. जमेल तेवढे ब्लॅंकेटचे दोर तो काढू लागला. मध्येच कोणाला जाग आली तर तो पुन्हा झोपल्यासारखं करायचा. त्याच्या शेजारच्या मुलाच्या हा प्रकार लक्षात आला होता. मात्र, तो धागे कशासाठी काढतोय, हे त्याला समजलं नाही. रात्रभर तो धागेच काढत होता. त्याने इतके धागे काढले की त्याचा दोरखंड तयार झाला. पहाटे सहाच्या सुमारास लवकर उठून तो बाथरूममध्ये गेला. लोखंडी अँगलला तो दोरखंड बांधला आणि त्याने आत्महत्या केली. सकाळी सात वाजता मुले जेव्हा झोपेतून उठली, तेव्हा त्याने गळफास घेतल्याचे दिसले. या सुधारगृहात एकच हलकल्लोळ माजला. इथून अनेक मुलांनी पलायन केलं होतं; पण अशा प्रकारची घटना पहिल्यांदाच घडल्याने कर्मचारीही हबकून गेले.
चाैकट :
आई-वडिलांसाठी हातावर त्याने ‘हे’ लिहिलं...
आत्महत्या करण्यापूर्वी त्याने मनगटापासून तळहातावर दोन ओळी लिहिल्या. या ओळींनी पोलिसांचे लक्ष वेधून घेतले. त्याने सुरुवातीला लिहिलं होतं. आई-वडिलांंना त्रास देऊ नका. त्यानंतर पुढे त्याने पाचजणांची नावे लिहिली आहेत. यामध्ये एका मुलीचे, तिच्या वडिलांचे आणि तीन नातेवाइकांची नावे आहेत; पण ही नावे लिहिण्यापाठीमागे त्याचा उद्देश मात्र स्पष्ट होत नाही.
चाैकट :
वडीलही कारागृहात..
मुलीला पळवून नेण्यास मुलाला मदत केल्याचा ठपका ठेवून वडूज पोलिसांनी त्याच्या वडिलांनाही अटक केली आहे. सध्या त्याचे वडील न्यायालयीन कोठडीत आहेत. आपल्यामुळे वडिलांनाही त्रास झाला, हे सहन न झाल्याने कदाचित त्याने टोकाचे पाऊल उचलले असावे, असे बोलले जात आहे.