कोल्हापूर नाक्यावर क्षणाक्षणाला घोंगावतोय मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:50 IST2021-06-16T04:50:28+5:302021-06-16T04:50:28+5:30

अपघाताची मालिका सुरूच आंब्याचा ट्रक पलटी उड्डाणपूलाच्या प्रतिक्षेत किती जाणार बळी लोकमत न्यूज नेटवर्क मलकापूर : पुणे-बंगळूर आशियायी महामार्गावर ...

Death at Kolhapur Naka | कोल्हापूर नाक्यावर क्षणाक्षणाला घोंगावतोय मृत्यू

कोल्हापूर नाक्यावर क्षणाक्षणाला घोंगावतोय मृत्यू

अपघाताची मालिका सुरूच आंब्याचा ट्रक पलटी

उड्डाणपूलाच्या प्रतिक्षेत किती जाणार बळी

लोकमत न्यूज नेटवर्क

मलकापूर : पुणे-बंगळूर आशियायी महामार्गावर येथील कोल्हापूर नाक्यावर महामार्गावरील अवजड वाहतुकीसह शहरातील वाहतूक एकाच मार्गाने होत असल्यामुळे याठिकाणी क्षणाक्षणाला मृत्यू डोक्यावर घोंगावत आहे. याठिकाणी दिवसातून किमान एक-दोन लहान-मोठे अपघात होत असतात. उड्डाणपूल रखडल्याने आत्तापर्यंत झालेल्या अपघातात अनेकजण जखमी झाले आहेत तर काहींना आपला जीव गमवावा लागला आहे. सोमवारी पहाटे आंब्याचा ट्रक पलटी झाल्याने पुन्हा एकदा हे अधोरेखित होत आहे.

कऱ्हाड शहराचे प्रवेशव्दार म्हणून ओळख असलेल्या कोल्हापूर नाक्यावर वाहतूक कोंडी होत असून, कऱ्हाडसह मलकापूरमध्ये तालुक्यातून व महामार्गावरून दररोज ये-जा करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, कोल्हापूर नाक्यावर महामार्गावरील अवजड वाहनांसह प्रवाशांची नेहमीच वर्दळ असते. याठिकाणी गर्दीतून मार्ग काढत महामार्गावरून कऱ्हाडमध्ये प्रवेश करताना वाहनधारकांसह प्रवाशांना जीव मुठीत घेऊनच प्रवेश करावा लागतो. कोल्हापूरकडून पुणे बाजूकडे जाण्यासाठी असलेल्या लेनवर उड्डाणपूल नसल्यामुळे कऱ्हाड शहरात येणारी वाहने व पुढे सातारा तसेच पुणे, मुंबईकडे जाणारी वाहने एकाच लेनवरून धावत असतात. महामार्गावर सातारा, पुणे बाजूकडे जाणारी वाहने भरधाव वेगात असतात तर शहरात येणाऱ्या वाहनांचा वेग मंदावलेला असतो. अशा परिस्थितीत अनेकवेळा अपघात झाले आहेत. या अपघातात महामार्ग चौपदरीकरणानंतर आत्तापर्यंत अनेकांना आपला जीव गामवावा लागला आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या अपघातात आठ वर्षाच्या बालिकेला जीव गमवावा लागला होता तर काले येथील वृद्ध दाम्पत्य जागीच ठार झाले. या जीवघेण्या अपघातांसह सोमवारी आंब्याचा ट्रक पलटी होऊन झालेल्या अपघातासारखे छोटे-मोठे अपघात नेहमीच होतात. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. यापुढेही उड्डाणपुलाच्या प्रतीक्षेत आनखी कितीजणांना जीव गमवावा लागेल, असा संतप्त प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे.

चौकट

उड्डाणपुलाला निधी मंजूर पण होणार कधी ?

उड्डाणपुलासाठी दहा वर्षांपूर्वी भूगर्भातील थर परीक्षण केले. परीक्षण हे परीक्षणच राहिले त्याचे पुढे काय झाले, हे आजही प्रलंबितच आहे. तर महामार्ग प्राधिकरणासह विविध विभागांकडून अनेकवेळा पाहणी करून नकाशे तयार केले. सर्वांच्या प्रयत्नाने निधीही मंजूर झाला. पण प्रत्यक्षात उड्डाणपूल केव्हा होणार, याची प्रतीक्षा आजपर्यंत काही संपलेली नाही.

चौकट

लॉकडाऊनमुळे अनर्थ टळला

कोल्हापूर नाक्यावर परमिट व बिगर परमिट वडापने उपमार्गावर ठाण मांडलेले असते. तर कऱ्हाडहून पुण्या-मुंबईकडे जाणारी व्हीआयपी वडापची वाहने महामार्गावरच ठाण मांडतात. दिवसभर याठिकाणी वाहतूक नियंत्रण करणाऱ्या पोलिसांसमोरच राजरोसपणे प्रवाशांची चढ-उतार सुरू असते. हे वडाप सध्या लॉकडाऊनमुळे बंद असल्यामुळे अनर्थ टळला.

चौकट

रात्रीच्यावेळी खासगी बसचे थैमान

कोल्हापूर नाक्यावर सायंकाळी ६ ते रात्री ९ यावेळेत अनेक खासगी प्रवासी बस पुण्या-मुंबईकडे जातात. त्यातील बहुतांशी बस प्रवासी घेण्यासाठी याठिकाणी थांबतात. अनेक चालक उपमार्गासह महामार्गावरच बस उभ्या करून थैमान सुरू असते.

फोटो कॅप्शन

कोल्हापूर नाक्यावर सोमवारी पहाटे आंब्याचा ट्रक पलटी झाला. लॉकडाऊनमुळे या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. ( छाया - माणिक डोंगरे)

===Photopath===

140621\img-20210614-wa0028.jpg

===Caption===

फोटो कॕप्शन

कोल्हापूर नाक्यावर सोमवारी पहाटे आंब्याचा ट्रक पलटी झाला. लॉकडाऊनमुळे या अपघातात कोणतीही जिवीत हानी झाली नाही. ( छाया - माणिक डोंगरे)

Web Title: Death at Kolhapur Naka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.