स्फोटात जखमी झालेल्या डिस्कळच्या जवानाचा मृत्यू
By Admin | Updated: April 22, 2016 22:22 IST2016-04-22T22:22:10+5:302016-04-22T22:22:34+5:30
खटाव तालुका सुन्न : बिकानेरमध्ये घडली होती दुर्घटना

स्फोटात जखमी झालेल्या डिस्कळच्या जवानाचा मृत्यू
बुध : राजस्थानातील बिकानेरमध्ये टँकच्या स्फोटात जखमी झालेले डिस्कळचे जवान तुषार तानाजी घाडगे यांचा उपचार सुरू असताना नवी दिल्ली येथे शुक्रवारी दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूमुळे डिस्कळसह खटाव तालुक्यावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात वडील, आई, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. सोळा वर्षांपूर्वी भारतीय लष्करात नाईक पदावर भरती झालेले जवान तुषार घाडगे हे राजस्थानातील बिकानेर येथे ०३ मेकॅनिकल इन्फन्ट्री रेजिमेंटमध्ये गेल्या पाच वर्षांपासून कार्यरत होते. दहा दिवसांपूर्वी तांत्रिक काम करीत असताना टँकचा स्फोट झाला होता. या स्फोटात काहीजण जखमी झाले होते. गंभीर जखमी अवस्थेतील तुषार घाडगे यांना तातडीने नवी दिल्ली येथील मिलिटरी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथेच शुक्रवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
ग्रामस्थ हळहळले
जवान तुषार घाडगे काही दिवसांनी सुटी घेऊन गावी येणार होते; मात्र दुर्दैवाने ते स्फोटात गंभीर जखमी झाले आणि अनेक दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर त्यांची प्राणज्योत मालवली. ही बातमी समजताच डिस्कळसह परिसरात सर्वजण हळहळले. तालुक्यात सर्वत्र शोकसंदेशांचे फलक लावण्यात आले आहेत.
आज पार्थिव येणार
तुषार घाडगे हे घरातील एकमेव कर्तेसवरते होते. त्यांच्या मृत्यूमुळे घाडगे कुटुंबीयांचा आधार हरवला असून, कुटुंबीयांसह डिस्कळ गाव शोकसागरात बुडाला आहे. जवान घाडगे यांचे पार्थिव शनिवारी सकाळी नवी दिल्ली येथून विमानाने पुण्याच्या लोहगाव विमानतळावर आणण्यात येणार असून, सायंकाळपर्यंत पार्थिव त्यांच्या मूळगावी डिस्कळ येथे पोहोचण्याची शक्यता आहे.