जेरबंद बिबट्याचा मृत्यू
By Admin | Updated: June 5, 2014 23:56 IST2014-06-05T23:55:08+5:302014-06-05T23:56:46+5:30
पिंजर्यातून पळाल्याने गारवडेत चार तासांचा थरार

जेरबंद बिबट्याचा मृत्यू
मल्हार पेठ/पाटण : गारवडे (ता. पाटण) येथील शिवारामध्ये जखमी स्थितीत वावरणार्या बिबट्याला आज, गुरुवारी वनविभागाने तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद केले. मात्र, पिंजर्यातून धूम ठोकून बिबट्या पसार झाला. त्यानंतर अर्ध्या तासाने मारूल हवेलीच्या शिवारातून त्याच बिबट्याला पुन्हा एकदा जेरबंद करण्यात आले, पण उपचारांसाठी पाटणला नेत असताना उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी सहाच्या सुमारास शिवारात गेलेल्या काही ग्रामस्थांना बिबट्या दिसला. त्यांनी युवकांना ही माहिती दिल्यावर युवकांनी धाव घेऊन बिबट्यावर पाळत ठेवली. त्यावेळी बिबट्या गर्द झाडीत दबा धरून बसला. युवकांनी घटनेची माहिती वनविभागाला दिली. नऊच्या सुमारास वनाधिकारी जी. एन. कोले, डी. आर. कुंभार, जयवंत कवर यांच्यासह वन कर्मचारी पिंजरा, जाळ्या, वाघर, दोरखंड आदी साहित्यांसह त्याठिकाणी दाखल झाले.
झाडीच्या बाजूस पिंजरा ठेवण्यात आला. बिबट्याचा माग घेत झाडे तोडण्यात आली. चोहोबाजूंनी बिबट्याला घेरल्यानंतर वन कर्मचार्यांसह प्रवीण दुपटे, सचिन कांबळे, नयन सामंत, दत्ता कांबळे, शक्ती सामंत या युवकांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. बिबट्या दिसताच दोरखंडाचा फास बिबट्यावर भिरकावला. फासकीत बिबट्या अडकल्यानंतर दोरखंडाने ओढून त्याला पिंजर्यात घालण्यात आले. पिंजरा टेम्पोत ठेवून पाटणकडे नेत असताना मारूल हवेली फाट्यावर पिंजर्याच्या मोठ्या फटीतून बाहेर पडत बिबट्याने चालत्या टेम्पोमधून झेप घेतली आणि उसाच्या शेतात पसार झाला. कर्मचार्यांची पुन्हा धावपळ झाली. बिबट्या लपून बसलेल्या शेताला वेढा देऊन पोलीस व ग्रामस्थ बिबट्याला पकडायला धावले. दोरखंड व जाळीच्या साह्याने बिबट्याला पुन्हा पकडले. पुन्हा पिंजर्यात कोंडून टेम्पोतून पाटणला नेण्यात आले. वैद्यकीय अधिकार्यांनी तपासणी केली व बिबट्याचा वाटेतच मृत्यू झाल्याचे सांगितले. मृतदेह वनविभागाच्या रासाटी येथील रोपवाटिकेत शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. (प्रतिनिधी)