सडावाघापूरला कोरोनाबाधित वृद्धेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:39 IST2021-04-01T04:39:35+5:302021-04-01T04:39:35+5:30
चाफळ : चाफळसह विभागात कोरोनाने पुन्हा एकदा शिरकाव केला आहे. शासनाने घालून दिलेल्या नियमांची पायमल्ली होत असल्याने कोरोनाचा ...

सडावाघापूरला कोरोनाबाधित वृद्धेचा मृत्यू
चाफळ : चाफळसह विभागात कोरोनाने पुन्हा एकदा शिरकाव केला आहे. शासनाने घालून दिलेल्या नियमांची पायमल्ली होत असल्याने कोरोनाचा पुन्हा कहर सुरू झाला आहे. दोन दिवसांपूर्वी सडावाघापूर येथील कोरोनाबाधित वृद्धेचा मृत्यू झाला, तर माजगाव येथे सहाजण कोरोनाबाधित आढळून आल्याने प्रशासनाची चांगलीच भंबेरी उडाली.
चाफळ विभागात कोरोनाने पुन्हा एकदा एन्ट्री केली असून, सोमवारी सडावाघापूर येथील एका वृद्धेचा कोरोनाने मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे, तर माजगाव येथील चार पुरुष व दोन स्त्रिया अशा एकूण सहाजणांचा अहवाल कोरोनाबाधित आल्याने माजगावकरांची धास्ती वाढली आहे. चाफळ आरोग्य केंद्रात माजगावातील संबंधितांच्या आरटीपीसीआर चाचण्या घेण्यात आल्या असून, त्या चाचणीत बाधित रुग्ण आढळून आल्याचे वैद्यकीय सूत्रांकडून सांगण्यात आले. माजगावात पाच महिन्यानंतर पुन्हा एकदा कोरोनाचा शिरकाव झाल्याने गावात भयावह स्थिती निर्माण झाली आहे.
विभागातील लोकांचा चाफळच्या बाजारपेठेशी थेट संपर्क येत असतो. शासकीय कामे, बँकेसह बाजाराच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात भागातील ग्रामस्थ चाफळला येत असतात. मात्र बाजारपेठेत शासन नियमांची पायमल्ली होताना दिसत आहे. एकीकडे पोलीस प्रशासन विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करत आहे; तर दुसरीकडे आरोग्य विभाग कर्मचारी कमी असूनही जिवाची बाजी लावत आहेत. याचे सर्वसामान्य नागरिकांना काहीच देणेघेणे नसल्याचे दिसून येत आहे. परिणामी चाफळकरांनाही याचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणेसह नागरिकांनी शासन नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज निर्माण झाली आहे.
दरम्यान, सडावाघापूर येथील मृत पावलेल्या संबंधितांचे नातेवाईक व संपर्कातील लोक तसेच माजगावमधील बाधितांच्या संपर्कातील लोकांच्या कोरोना चाचण्या करण्यात येणार असल्याचेही आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे.